पुणे : मराठवाडा मित्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने (एम.एम.सी.ओ.ई.), पुणे, आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत बिंगहॅम्टन विद्यापीठ, स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (एस.यू.एन.वाय.) यांच्यासोबत सामंजस्य करार केला. महाविद्यालया च्या आंतरराष्ट्रीय संबंध कक्षाच्या माध्यमातून हा करार झाला.या करारामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ३.५ + १.५ एकात्मिक पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग हा या सहकार्याचा महत्त्वाचा भाग आहे . या माध्यमातून महाविद्यालयाच्या पात्र विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण करून पुढील उच्च शिक्षणासाठी बिंगहॅम्टन विद्यापीठात प्रवेशाची दिशा मिळणार आहे.या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय संबंध कक्षाच्या प्रमुख डॉ. गिरिजा चिद्दरवार यांनी पुढाकार घेतला. मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे अध्यक्ष बी.जी. जाधव, प्राचार्य डॉ.सचिन साखरे आणि उपप्राचार्य डॉ. स्वाती देशमुख यांचे प्रोत्साहन आंतरराष्ट्रीय उपक्रमांना मिळाले.
या सामंजस्य कराराचा उद्देश दोन्ही संस्थांमधील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देवाणघेवाण, जागतिक अनुभव, उच्च शिक्षणाच्या संधी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि विविध सहकार्यात्मक उपक्रम अधिक सक्षम करणे हा आहे. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या व्यापक संधी मिळून जागतिक शैक्षणिक वातावरणात उच्च शिक्षण घेण्याची क्षमता अधिक विस्तारेल,असे यावेळी सांगण्यात आले.दि.२७ ऑगस्ट २०२६ रोजी हा करार झाला.