मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सरकारकडून अद्याप अधिकृत शिष्टमंडळ चर्चेसाठी दाखल झालेले नसल्याने जरांगे पाटील यांनी आता मुंबई आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. मराठा समाजाने 12 सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, “आम्ही मुंबईला जाण्याची तयारी करत आहोत. मराठा समाजाने 12 सप्टेंबरपर्यंत हळूहळू मुंबईला जावे. आपल्या सोयीनुसार मुंबईत राहण्याची व्यवस्था करावी. मात्र, आझाद मैदानावर जाऊ नका,” असे त्यांनी म्हटले.
मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांनी नातेवाईक, मित्र किंवा परिचितांकडे राहावे, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यास घाबरून न जाता पोलीस ठाण्यात जाण्याचे आवाहन त्यांनी केले. “उपोषण सोडणार नाही. मी स्वतः मराठा समाजासोबत मुंबईला जाणार,” अशी भूमिकाही जरांगे यांनी स्पष्ट केली.
सरकारकडून अद्याप संपर्क नाही
उपोषणाला तीन दिवस उलटूनही सरकारकडून कोणताही ठोस संपर्क झालेला नसल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. सर्व मराठा बांधवांनी एकाच वेळी मुंबईकडे जाणे शक्य नसल्याने नियोजनानुसार टप्प्याटप्प्याने मुंबईत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सवाच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “गणेशोत्सव आपला आहे. आम्ही 11 दिवस गणपती बसवतो आणि ते दीड दिवस बसवतात; तरी ते आम्हाला देव-देव शिकवतात. आमच्याएवढे पुण्य कोण करतं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“24 तासांत संपर्क साधू” या भूमिकेवर जरांगेंचा टोला
मंत्री उदय सामंत यांच्या संभाव्य दौऱ्याबाबत तसेच सरकारकडून संपर्क साधला जाण्याच्या चर्चेवरही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. “24 तासांत संपर्क साधू म्हणजे पावसासारखं आहे का? हळूहळू सरी पडणार का?” असा टोला लगावत त्यांनी मराठा समाजाला मुंबईच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले.
“भिडलो असतो तर शिंदेंना पळायलाही जागा राहिली नसती”
दरम्यान, परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मेळावा रद्द करण्याचा इशारा दिला होता. मात्र, हा मेळावा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
याबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी दावा केला की, एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला आपला दौरा रद्द केला होता. मात्र, काही वेळाने अधिकाऱ्यांकडून जरांगे यांनी परवानगी दिल्याचा संदेश त्यांना मिळाल्याने ते मेळाव्याला आले.
“आम्ही भिडलो असतो तर एकनाथ शिंदे साहेबांना पळायलाही जागा राहिली नसती,” असा आक्रमक दावा जरांगे पाटील यांनी केला.दरम्यान, सरकारकडून चर्चेसाठी शिष्टमंडळ येते का आणि पुढील काळात आंदोलनाची दिशा काय राहणार, याकडे आता मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.