छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स बसने पुढे धावणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. वैजापूरजवळ हडस पिंपळगाव शिवारात झालेल्या या अपघातात ६५ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला असून, १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रवाशाचे नाव हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय ६५, रा. वैजापूर) असे आहे. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये सुमारे ३० प्रवासी होते. चॅनेज क्रमांक ४७३.६ जवळ ट्रॅव्हल्सने कंटेनरला मागून धडक दिल्याने बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
धडक एवढी जोरदार होती की, काही प्रवासी बसमध्ये अडकले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, वैजापूर पोलीस, महामार्ग पोलीस आणि रस्ता सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने अथक प्रयत्न करून जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले.
सर्व जखमींना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. गरजेनुसार गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, अपघातामुळे समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.
भरधाव वेग, चालकाचा वाहनावरील ताबा सुटणे किंवा अन्य कोणते कारण या अपघातामागे आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. या दुर्घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.