पुणे : गणेशोत्सवाच्या काळात वाढणारा ध्वनिप्रदूषणाचा त्रास, अश्लील गाणी आणि मनोरंजनाच्या नावाखाली होणाऱ्या कार्यक्रमांवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उत्सवांच्या नावाखाली सुरू असलेला धांगडधिंगा आणि त्यातून नागरिकांना होणारा त्रास थांबवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मेधा कुलकर्णी यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचा संदर्भ देत धार्मिक उत्सवांचे बदलते स्वरूप यावर प्रश्न उपस्थित केला. “गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा घालत असाल, तर यात कुठली धार्मिकता आहे? अर्धनग्न अवस्थेत अंगविक्षेप केले जात असतील, तर ते श्रीकृष्णाला किंवा गणपतीला आवडेल का?” असा सवाल त्यांनी केला.
‘उत्सवांच्या नावाखाली विकृत स्वरूप नको’
उत्सवांना आलेल्या विकृत स्वरूपामुळे पर्यावरणासोबतच नागरिक, प्राणी आणि आजारी वृद्धांनाही त्रास होत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. दहीहंडी, नवरात्र आणि गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या मोठ्या आवाजातील कार्यक्रमांवर आवश्यक निर्बंध असले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.आपण आस्तिक असून देव, देश आणि धर्म मानणारी व्यक्ती असल्याचे सांगत त्यांनी धार्मिक उत्सव साजरे करण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, धर्माच्या नावाखाली अश्लीलता आणि धांगडधिंगा योग्य नाही, असे त्यांनी म्हटले.
‘श्रीकृष्णाची नीती समजून घ्या’
गौतमी पाटीलला बोलावून कार्यक्रम घेणाऱ्यांनी श्रीकृष्णाच्या विचारांचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचा अभ्यास करण्याची गरज असल्याचेही कुलकर्णी म्हणाल्या. केवळ मनोरंजनाला धार्मिकतेचे स्वरूप देणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
‘तुमच्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये’
नवरात्रातील दांडिया आणि इतर कार्यक्रमांमध्ये अश्लील अर्थाची गाणी वाजवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा अर्थ इतरांच्या अधिकारांवर गदा आणणे असा नाही. आपल्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा किंवा शांततेचा भंग होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गणेश मंडळांना मेधा कुलकर्णींचे आवाहन
पुण्यातील गणेश मंडळे आणि लोकप्रतिनिधींनी ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन मेधा कुलकर्णी यांनी केले. मोठ्या आवाजातील डीजे, प्लाझ्मा आणि इतर ध्वनियंत्रणांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.गणेशोत्सव हा धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा व्हावा, अश्लील गाणी, कर्णकर्कश आवाज आणि अनावश्यक धांगडधिंगा टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.