पुणे : पुण्यातील खराडी परिसरात २३ वर्षीय संगणक अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या २३ वर्षीय प्रियकराला अटक केली असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जान्हवी पाठक (वय २३) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती मूळची बिहारची असून गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यातील खराडी परिसरात राहत होती. एका आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून ती कार्यरत होती. शुक्रवारी दुपारी साडेएकच्या सुमारास खराडीतील रिव्हर डेल सोसायटीमध्ये ही घटना घडली.
या प्रकरणी जान्हवीच्या उत्तर प्रदेशात राहणाऱ्या ४९ वर्षीय काकांनी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अमृतकुमार अरुणकुमार सिंह (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
शाळेपासून होती ओळख
जान्हवी आणि अमृतकुमार यांची शाळेपासूनच ओळख होती. दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. जान्हवीने राजस्थानमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते, तर अमृतकुमार नोएडातील एका आयटी कंपनीत काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुण्यात भेटायला आला आणि वाद झाला
जान्हवीला भेटण्यासाठी अमृतकुमार दोन दिवसांपूर्वी नोएडाहून पुण्यात आला होता. गुरुवारी रात्री दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये मारामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.यानंतर शुक्रवारी सकाळी अमृतकुमार खोलीच्या खाली आला. त्याच दरम्यान जान्हवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.
वादामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात
दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, तसेच त्यांच्या नात्यात कोणता तणाव निर्माण झाला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रियकराला अटक केल्यानंतर पोलिस त्याची चौकशी करत असून, या तपासातून आत्महत्येमागील नेमके कारण आणि घटनेपूर्वी काय घडले याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. खराडी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.