पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात मुक्तीच्या शिक्षणाचा विचार पसरवणा-या समाज शास्रज्ञ डॉ. गी प्वॉत्व्हँ यांच्या २२ व्या स्मृती दिनानिमित्ताने मणिपूरच्या सुभाशीनी नओरेम आणि शिरुर येथील लोक जागृती चळवळ यांना डॉ. गी प्वॉत्व्हँ स्मृती चेतना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. गांधी भवन कोथरूड येथे ३० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमात लोक जागृती चळवळीच्यावतीने रविंद्र धनक यांनी पुरस्काराचा स्विकार केला. शाल, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख, समाजवादी विचारवंत डॉ. अभिजीत वैद्य, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अन्वर राजन उपस्थित होते. अध्यक्षस्थानी गरीब डोंगरी संघटनेच्या कुसुम सोनवणे होत्या.सीताराम बाजारे, पंडीत पडळघरे, भाऊसाहेब वायदंडे, नमिता वाईकर यांनी मनोगत व्यक्त केले.स्वागत व प्रास्तविक जितेंद्र मैड यांनी केले.
डॉ. अभिजित वैद्य म्हणाले की, लोकशाही, समाजवादी राज्य उभारायचे असेल तर डॉ. गी यांनी सुरु केलेली शिक्षण पध्दती रूजवायला हवी. डॉ. गी हे लोकशाही, समाजवादी होते. फ्रान्समधून भारतात आल्यावर या देशाला आपली मातृभूमी माणून आपले अख्खे आयुष्य या देशातल्या तळागाळातल्या माणसांसाठी समर्पित केले.भारतीय माणसाला मणिपूर, काश्मीर वा सीमावर्ती भागातील नागरिक आपले वाटत नसतील तर तो येथील व्यवस्थेत असणारा मोठा दोष आहे. मणिपूर अजूनही अशांत आहे. कारण ही आग लागलेली नाही तर लावलेली आहे. काही भांडवल शहांच्या घशामध्ये मणिपूर मधील खनिज संपत्ती घालण्यासाठी तेथे व्देषाच्या वणवा पेटवला आहे. मणिपूर जळत असताना देशाचा राजा जगभर पुरस्कार घेत फिरतोय. आपल्या देशाचा परराष्ट्र मंत्री चीनला आम्ही जाब विचारु शकत नाही असे जाहीर सांगतो. छप्पन इंची छाती फक्त पाकिस्तान पुरतीच आहे का. मणिपूर भारतात आहे का हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आमची मान शरमेने खाली जाते.
डॉ. अभिजित वैद्य म्हणाले की, लडाख मधले लोक म्हणतात, आम्हाला प्रश्न विचारला जातो की तू चीनचा आहेस की नेपाळी. काश्मिरी लोकांना देशद्रोही म्हणून हीनवले जाते. पंजाबी लोकांना खलिस्तानी म्हणून संशयाने पाहिले जायचे. सीमावर्ती भागात राहणा-या लोकांनी अंगावर गोळ्या झेलत देशाच्या सीमांचे रक्षण केले आहे. हे देशाच्या मध्यवर्ती भागात राहणा-या लोकांनी विसरु नये. वंदे मातरमला विरोध करणारे आज पूर्ण वंदे मातरम म्हणण्याचा आग्रह धरत आहेत. देशभक्तीची व्याख्या या लोकांनी सवंग करुन टाकली आहे. फक्त रस्ते जोडू नका, माणसे जोडा, त्यातून देश उभा राहील. विकास हा तळागाळतल्या माणसा पर्यंत पोहचला पाहिजे.
रविंद्र धनक म्हणाले की, आमचे शिरूर गाव हे व्यापारी पेठ आहे. राजकीय धोरण हे अर्थव्यवस्थेवर वर्चस्व असणारांच्या हातात असते. सर्वसामान्यांच्या हातात ते येणार नाही याची पुरेपूर काळजी राजकारणी घेत असतात. अशा वेळी लोक जागृती चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम लोकसहभागातून आम्ही करतो आहोत.सुभाशीनी नओरेम यांनी डॉ. गी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार मिळालेला पुरस्कार हा मोठा सन्मान असल्याचे सांगत मणिपूर व सीमावर्ती भागातील जनतेला सर्वांच्या सहकार्याची, मित्रत्वाची आवश्यकता व्यक्त केली. भारतीय नागरिक असूनही आमच्या नागरिकत्वा बद्दल जेव्हा प्रश्न उपस्थित केले जायचे तेव्हा आश्चर्य वाटायचे. हा प्रश्न केवळ एकट्या माझा नसून माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचा होता. आम्ही संस्थेच्या माध्यमातून समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी, समाजाचा व देशाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
सिताराम बाजारे म्हणाले की, विषमता हटविण्याासाठी विकासाचे धोरण तळागाळातल्या लोकांना नजरे समोर ठेवून आणि विश्वासात घेवून करायला हवे. बिनभिंतीची शाळा, वसतीगृहे, स्वयंशिक्षण, पंचायत राज, यासारख्या उपक्रमामुळे दुर्गम भागातील लोक स्वतःचे प्रश्न स्वतः सोडविण्यासाठी पुढाकार घेवू लागले.
पंडित पडळघरे म्हणाले की, समाजशास्रज्ञ असलेल्या डॉ. गी यांनी भाषण देण्यापेक्षा चर्चेला भर दिला. प्रश्न उपस्थित करणे व त्यावर विचार करायला प्रवृत्त करणे ही पध्दत. अनुभवाने जे शिक्षण मिळते ते जास्त रुजते. सर्वसामान्य माणसाला बोलते केले. आवश्यक तेथे तज्ञांशी चर्चा घडवून आणत त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे कशी मिळतील याला प्राधान्य दिले. जे समोर दिसते त्याचे विश्लेषण करा, चिकित्सा करा आणि त्यामध्ये आपण कुठे आहोत हे पाहायला डॉ. गी यांनी आम्हाला शिकवले. समाज अस्वस्थ असताना सगळे चांगले चालले आहे असे भासवले जात आहे.
भाऊसाहेब वायदंडे म्हणाले की, पोतराज असलेल्या माझ्यासारख्या युवकाला डॉ. गी यांनी जटा मुक्त केले. आता हे सांगणे सोपे वाटत असले तरी त्या काळातील परिस्थिती आणि मानसिकता वेगळी होती. माझ्या नंतर आठ जणांची जटा मुक्ती झाली. मानव मुक्तीचे जे काम गी बाबा यांनी सुरु केले ते पुढे नेण्याची गरज आहे.
नमिता वाईकर यांनी डॉ. गी यांनी सुरु केलेल्या जात्यावरील ओव्यांच्या संकलनाची माहिती दिली. यातील ८२ हजार ओव्या इंग्रजी मध्ये भाषांतरीत झाल्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांचा असलेला हा ज्ञान साठा जास्तीत जास्त जनते पर्यंत पोहचवण्याचे काम पीपल्स अर्काईव्ह इन रूरल इंडियाच्या माध्यमातून सुरु आहे.