पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांना पुणे येथे जय वैभवलक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने ‘सहकारभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दिलीपराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना दिली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मराठवाड्यात सहकार चळवळ रुजविण्यासाठी मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर या कार्याला पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण काम दिलीपराव देशमुख यांनी केले.
शिस्त, नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून त्यांनी सहकारी संस्थांच्या कारभाराला दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरा परिवारातील विविध साखर कारखाने आणि सहकारी संस्था उल्लेखनीय पद्धतीने कार्यरत असून, या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी आणि कामगार वर्गाच्या आर्थिक विकासाला हातभार लागत आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातूनही दिलीपराव देशमुख यांनी सहकार क्षेत्राला भक्कम आधार देण्याचे काम केले आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्यातील एक सक्षम आणि उल्लेखनीय सहकारी बँक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मांजरा परिवारातील संस्थांच्या कार्यपद्धतीचा तसेच सहकार क्षेत्रातील विविध प्रयोगांचा राज्यातील अनेक सहकारी संस्थांनी आदर्श घेतला आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थचक्र गतिमान करण्यासाठी या संस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
दिलीपराव देशमुख यांच्या प्रदीर्घ सहकार कार्याची पुणे येथे ‘सहकारभूषण’ पुरस्काराने झालेली दखल ही त्यांच्या कार्याची पावती मानली जात आहे. सहकार क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव झाल्याने लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील त्यांच्या समर्थकांकडून आणि सहकार क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

‘सहकारभूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलीपराव देशमुख यांचे मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून सहकार क्षेत्राला भविष्यातही नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.