मुंबई : विक्रोळीतील कन्नमवार नगर परिसरात बंद दुकानातून महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात मृत महिलेची ओळख सुनीता मोरे (वय 29) अशी पटली असून, या प्रकरणात त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका बांगडी विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.
बंद दुकानात आढळला मृतदेह
29 ऑगस्ट रोजी कन्नमवार नगर-2 येथील विकास शाळेजवळ असलेल्या स्वयंभू गणेश मार्केटमधील बंद दुकानात महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने ओळख पटवणेही कठीण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाला सुरुवात केली.
बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांत तक्रार
सुनीता मोरे या 25 ऑगस्ट रोजी केळी विकण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या घरी परतल्या नाहीत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. काही दिवसांनी बंद दुकानात मृतदेह सापडल्यानंतर तो सुनीता मोरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
पतीने बोटावरून केली ओळख
मृतदेहाची अवस्था पाहता ओळख पटवणे अवघड होते. मात्र, सुनीता यांच्या पतीने त्यांच्या बोटावरून मृतदेहाची ओळख पटवली, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सुनीता यांच्या पश्चात पती आणि तीन लहान मुले आहेत.
शेजाऱ्यावर हत्येचा आरोप; पोलिसांकडून अटक
तपासादरम्यान पोलिसांनी सुनीता यांच्या शेजारी राहणाऱ्या फजूल रेहमान मेहरबान कुरेशी याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सुनीता यांची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा त्याला अटक केली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सुनीता यांना बंद दुकानात नेल्यानंतर त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने आरोपीने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणातील नेमके कारण आणि घटनाक्रमाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
‘आरोपी एकटा नाही’, पतीचा दावा
सुनीता यांच्या पतीने प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणात आणखी काही जण सहभागी असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आरोपीने पोलिसांना वेगळी माहिती दिल्याचा दावा करत, “आरोपी एकटा नसून त्याच्यासोबत आणखी काही जण असू शकतात,” असा संशय त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून या हत्येमागील नेमके कारण, घटनाक्रम आणि अन्य कोणी सहभागी होते का, याचा तपास केला जात आहे. सुनीता मोरे यांच्या कुटुंबीयांनी आरोपीवर कठोर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.