सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय
  • मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
  • स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
  • पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी पुण्यात मोठी कारवाई, मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक, अमित ठाकरेंवरही गुन्हा
 शहर

मोदींचा फोटो हटवला अन् पुण्यात मनसेवर कारवाई; दोन पदाधिकाऱ्यांना अटक, अमित ठाकरेंवरही गुन्हा दाखल

डिजिटल पुणे    01-09-2026 17:32:46

पुणे : शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणावरून पुण्यात राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणी मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित ठाकरे हे सोमवारी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि महाविद्यालयातील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात गेले होते. यावेळी कँटिनमधील जेवणाची व्यवस्था आणि स्पोर्ट्स कोट्यातील खेळाडूंना प्रशिक्षक उपलब्ध नसल्याचा मुद्दा त्यांनी महाविद्यालय प्रशासनासमोर उपस्थित केला.

याचवेळी एका विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील छायाचित्रांकडे अमित ठाकरे यांचे लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मुख्याध्यापकांकडे याबाबत प्रश्न उपस्थित केला.

यानंतर मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो भिंतीवरून खाली उतरवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला अधिकच वेग आला.

रात्री उशिरा दोघांना अटक

फोटो हटवल्याच्या प्रकरणात चतुःश्रृंगी पोलिसांनी प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे यांना अटक केली आहे. त्याआधी अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईमुळे मनसेच्या गोटात नाराजी व्यक्त केली जात असून, राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

फोटो हटवण्याच्या कृतीचं अमित ठाकरेंकडून समर्थन

दरम्यान, अमित ठाकरे यांनी या घटनेवर भूमिका स्पष्ट करत फोटो हटवण्याच्या कृतीचं समर्थन केलं. शासकीय महाविद्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असल्यास तो इतर ठिकाणी लावावा, मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांच्या शेजारी तो लावू नये, असं त्यांनी म्हटलं.

नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी करता येणार नाही, अशी भूमिका अमित ठाकरे यांनी मांडली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.या घटनेनंतर पुण्यात मनसे आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता असून, फोटो हटवण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत.


 Give Feedback



 जाहिराती