सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय
  • मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
  • स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
  • पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी पुण्यात मोठी कारवाई, मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक, अमित ठाकरेंवरही गुन्हा
 राज्य

पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टतर्फे उत्कृष्ट गणेश मंडळांचा गौरव

MSK    01-09-2026 21:49:34

पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टतर्फे उत्कृष्ट गणेश मंडळांचा गौरव

पुणे शहर : पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने सन २०२५ मधील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ पुरस्कार वितरण सोहळा, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम तसेच गणेशोत्सव २०२५ मधील परीक्षकांचा सत्कार सोहळा आज, दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता, आर.एस.पी. शेड, शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, पुणे येथे पार पडला.

या कार्यक्रमास पुणे शहराचे मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार तसेच विघ्नहर्ता ट्रस्ट, पुणेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत सन २०२५ मधील उत्कृष्ट गणेश मंडळांना प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील एकूण ४९ उत्कृष्ट गणपती मंडळांचा गौरव करण्यात आला.

तसेच सन २०२५ मधील गणेशोत्सवाचे परीक्षक यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट गुण मिळविलेल्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास पुणे शहराचे मा. पोलीस सहआयुक्त श्री. संजय दराडे, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग श्री. राजेश बनसोडे, मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व विभाग श्री. मनोज पाटील, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस आयुक्त प्रशासन श्री. संजय पाटील तसेच पुणे शहर पोलीस दलातील विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विघ्नहर्ता ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, गणेश मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते, शिष्यवृत्ती मंजूर झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक, शिक्षक तसेच पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टचे एकूण २३० परीक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पुणे शहराचे मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टचे विश्वस्त श्री. डॉ. मिलिंद भोई यांनी ट्रस्टच्या स्थापनेमागील उद्देश व कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टचे उपाध्यक्ष तथा पुणे शहराचे मा. पोलीस सहआयुक्त श्री. संजय दराडे यांनी ट्रस्ट हा पोलीस प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगितले. ट्रस्टच्या स्थापनेपासून उल्लेखनीय कार्य करण्यात आले असून ट्रस्टची व्याप्ती वाढविण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांसाठी आणखी चांगले काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

पुणे शहराचे मा. पोलीस आयुक्त तथा पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अमितेश कुमार यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गणेशोत्सवाच्या कालावधीत विघ्नहर्ता ट्रस्टच्या परीक्षक मंडळाने निस्वार्थीपणे गणेश मंडळांना भेटी देऊन त्यांचे गुणांकन केले. उत्कृष्ट गणेश मंडळांची निवड करण्यासाठी कार्य करणाऱ्या सर्व परीक्षकांचे त्यांनी हार्दिक अभिनंदन केले.

गणेशोत्सवाच्या कालावधीत ध्वनी प्रदूषण कायद्याचे तसेच मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून ते सर्वांना बंधनकारक आहे. गणेशोत्सव मंडळांनी स्वतःहून कायदे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.

उत्कृष्ट गणेश मंडळांचा गौरव

पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टचा मानाचा फिरता करंडक प्रथम क्रमांक – श्री. शनी बाल मारुती मित्र मंडळ, एरंडवणे, पुणे यांना प्रदान करण्यात आला.

सन २०२५ मध्ये परिमंडळ १ ते ५ या कार्यक्षेत्रात १० दिवस उत्कृष्ट गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल एकूण ३१ गणेश मंडळांना पुणे विघ्नहर्ता ट्रस्टतर्फे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पुरस्कार तसेच प्रशस्तीपत्र देण्यात आले.

तसेच लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, कर्वे रोड आणि खडकी बाजार या विसर्जन मार्गांवरील एकूण १८ गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार तसेच प्रशस्तीपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये एकूण ४९ गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टतर्फे शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये २,०००/- शिष्यवृत्ती तसेच स्कूल बॅग किट प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी विघ्नहर्ता ट्रस्टचे विश्वस्त श्री. प्रविण चोरबोले यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

 


 Give Feedback



 जाहिराती