सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरे गटाच्या जोरदार युक्तिवादानंतर आज शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार; धनुष्यबाण चिन्हाचा वाद निर्णायक टप्प्यावर
  • : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी 2 नंतर पुन्हा सुनावणी होणार आहे
 क्राईम

इंदापुरात संतापजनक प्रकार! जमिनीच्या वादातून वृद्ध आई-वडिलांना पोटच्या मुलांकडून भररस्त्यात दांडक्याने केली मारहाण

डिजिटल पुणे    02-09-2026 12:54:20

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून कौटुंबिक नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून वृद्ध आई-वडिलांना त्यांच्या दोन मुलांनीच रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम किसन राऊत (वय ६५, रा. सरस्वतीनगर, इंदापूर) हे ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास पत्नी अंजना यांच्यासोबत तरंगवाडी गावच्या हद्दीत फिरण्यासाठी गेले होते. दोघेही सलीम लान्सजवळील डांबरी रस्त्यावरून जात असताना त्यांच्याजवळ एक टाटा नेक्सॉन कार येऊन थांबली.

या कारमधून तुकाराम राऊत यांची दोन मुले संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत खाली उतरले. त्यानंतर दोघांनी आई-वडिलांना रस्त्यात अडवून त्यांच्याशी वाद घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

जमिनीच्या विक्रीवरून वाद

आई अंजना यांच्या नावावर असलेली जमीन विकल्याचा जाब दोन्ही मुलांनी आई-वडिलांकडे विचारल्याचा आरोप आहे. याच मुद्द्यावरून वाद वाढल्यानंतर दोघांनी हातातील लाकडी दांडक्याने तुकाराम राऊत आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मारहाणीदरम्यान विकलेली जमीन पुन्हा माघारी घ्या, अशी मागणी करण्यात आली. जमीन परत घेतली नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी देण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचेही पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मारहाणीचा व्हिडिओ समोर

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्याने घटनेची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. भररस्त्यात वृद्ध आई-वडिलांना मारहाण होत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेबाबत नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.

घटनेनंतर तुकाराम राऊत यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत, दोघेही रा. माळवाडी नं. २, ता. इंदापूर, यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून आणि कोणत्या परिस्थितीत घडला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांची पडताळणी तसेच घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि इतर बाबींच्या आधारे इंदापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती