सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरे गटाच्या जोरदार युक्तिवादानंतर आज शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार; धनुष्यबाण चिन्हाचा वाद निर्णायक टप्प्यावर
  • : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी 2 नंतर पुन्हा सुनावणी होणार आहे
 विश्लेषण

महापुरात आजूबाजूची घरं वाहून गेली, पण ४० वर्षांचं हे घर मात्र भक्कम उभं; घरमालकाने सांगितलं नेमकं कारण

डिजिटल पुणे    02-09-2026 16:03:22

नेपाळ : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला. पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अनेक घरे, इमारती आणि वाहने वाहून गेली. या विध्वंसाची अनेक दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र, या सगळ्यात एका घराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चहूबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढलेले असतानाही तब्बल ४० वर्षे जुने हे घर मात्र तग धरून उभे राहिले. आता या घराच्या मालकाने त्यामागचे कारण सांगितले आहे.

घराभोवती फक्त पाणी आणि विध्वंस

नेपाळच्या नुवाकोट जिल्ह्यातील प्रकाश यांच्या घराभोवती पुराचे पाणी साचले होते. त्रिशूली नदीला आलेल्या महापुरामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला होता. आजूबाजूची घरे आणि इमारती पाण्याच्या प्रवाहात कोसळत असताना वाहनांसह अनेक वस्तू वाहून जात होत्या. अशा परिस्थितीत प्रकाश आणि त्यांचे कुटुंबीय घरात अडकले होते.

प्रकाश यांच्या कुटुंबात एकूण सहा जण होते. पुराचे पाणी वेगाने वाढू लागल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसह घराच्या वरच्या मजल्यावर आश्रय घेतला. मात्र, काही वेळातच पाणी त्या भागापर्यंत पोहोचले. त्यामुळे कुटुंबीयांना आणखी वरच्या सुरक्षित भागात जावे लागले.

‘आयुष्याचा शेवटचा क्षण वाटत होता’

या भयावह प्रसंगाची आठवण सांगताना प्रकाश यांनी सांगितले की, चारही बाजूंनी पाणी वाढत होते आणि पुराचा वेगही सतत वाढत होता. आजूबाजूचा विध्वंस पाहून आपलं आयुष्य कदाचित संपणार, अशी भीती मनात निर्माण झाली होती.

प्रकाश हे त्यावेळी त्यांच्या दुकानात होते. पुराचे पाणी वाढत असल्याची माहिती मिळताच ते तातडीने घरी पोहोचले. घरात कुटुंबीयांना सुरक्षितपणे घेऊन जात असताना त्यांनी पुराच्या पाण्यात एक गाडी उलटल्याचे पाहिले. हे दृश्य पाहून परिस्थितीची भीषणता त्यांच्या लक्षात आली.

४० वर्षांच्या जुन्या घराचा मजबूत पाया ठरला आधार

महापुराच्या तडाख्यातही घर सुरक्षित राहण्यामागे त्याचा मजबूत पाया महत्त्वाचा ठरल्याचे प्रकाश यांचे म्हणणे आहे. नदीजवळ घर बांधताना सुरुवातीपासूनच पायाच्या मजबुतीकडे विशेष लक्ष देण्यात आले होते.घराचा पाया मजबूत करण्यासाठी रस्ते बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे घराची रचना मजबूत झाली आणि पुराच्या प्रचंड प्रवाहातही ते उभे राहू शकले, असे प्रकाश यांनी सांगितले.

महापुरातही घर ठरलं चर्चेचा विषय

नेपाळमधील या महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असताना ४० वर्षे जुने हे घर मात्र सुरक्षित राहिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. घरमालकाच्या मते, मजबूत पाया आणि बांधकामाच्या वेळी घेतलेली खबरदारी यामुळेच हे घर एवढ्या भीषण पुरातही टिकून राहिले.


 Give Feedback



 जाहिराती