पुणे : श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल जाहीर केले आहेत. ४ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंती तर ५ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव साजरा होणार असून, शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध रस्त्यांवर वाहतूक बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पुणे शहरातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड आणि टिळक रोड या मध्यवर्ती भागांमध्ये दहीहंडी फुटेपर्यंत मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने, जसे की फायरब्रिगेड, पोलीस वाहने आणि रुग्णवाहिका यांना आवश्यकतेनुसार मार्ग देण्यात येणार आहे.
बंडगार्डन परिसरात वाहतूक बंद
५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत आवश्यकतेनुसार तीन तोफा चौक ते ब्ल्यू नाईल चौक, इस्कॉन मंदिरासमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यासाठी ब्ल्यू नाईल चौक ते तीन तोफा चौक हा मार्ग दुतर्फा वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वानवडीतील शिवरकर रोड बंद
५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत शिवरकर रोडवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी संविधान चौकातून वळून सनग्रेस स्कूल, साळुंखे विहार रोड तसेच फ्लॉवर व्हॅली लेन-केंदारी पेट्रोल पंप या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फडके हौद परिसरात मोठे वाहतूक बदल
४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत फडके हौद परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. जिजामाता चौक, सोन्या मारुती चौक, दारुवाला पूल आणि मोती चौकाकडून फडके हौदकडे येणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध असतील.
वाहनचालकांना गाडगीळ पुतळा, कुंभारवेस चौक, पवळे चौक, माया बेकरी, देवजीबाबा चौक, हमजेखान चौक आणि लक्ष्मी रोड आदी पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवाजी रोड, बाजीराव रोडवरही वाहतूक बदल
५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून फरासखाना आणि विश्रामबाग वाहतूक विभागाच्या हद्दीत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. शिवाजी रोडवरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोड, खंडोजी बाबा चौक, टिळक चौक आणि पुढे टिळक रोड/शास्त्री रोडचा मार्ग वापरावा लागणार आहे.
तसेच बुधवार चौकातून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सोडण्यात येणार असून, रामेश्वर चौक ते शनिपार चौक या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
लष्कर परिसरातही वाहतुकीवर निर्बंध
दहीहंडीच्या दिवशी लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीत सायंकाळी ४ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत विविध ठिकाणी वाहतूक वळवण्यात येणार आहे. वाय जंक्शन, महात्मा गांधी रोड, व्होल्गा चौक, महंमद रफी चौक, महावीर चौक, सरबतवाला चौक, बाबाजान चौक आणि कुरेशी मस्जिद परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
वारजे, समर्थ आणि काळेपडळ परिसरातही बदल
४ आणि ५ सप्टेंबर रोजी वारजे परिसरात सायंकाळी ४ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत वाहतुकीत बदल राहतील. राजाराम पूल, कमिन्स चौक, आंबेडकर चौक आणि कर्वे रोड परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
समर्थ वाहतूक विभागात १५ ऑगस्ट चौक-जाधव बेकरी, बनकर तालीम चौक-जुना मोटार स्टॅण्ड आणि नरपतगिरी चौक-बरके आळी या मार्गांवर बदल करण्यात आले आहेत.
काळेपडळ परिसरातही श्रीराम चौक, काळेपडळ रोड, सय्यद नगर, कृष्णा नगर आणि तखडे वस्ती या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
वाहतूक पोलिसांचे वाहनचालकांना आवाहन
दहीहंडी उत्सवादरम्यान गर्दीच्या परिस्थितीनुसार वाहतुकीतील बदल आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.
मुख्य सूचना : दहीहंडीच्या दिवशी पुण्यातील मध्यवर्ती भागात जाण्यापूर्वी वाहनचालकांनी वाहतूक बदलांची माहिती घेऊनच प्रवास करणे फायदेशीर ठरणार आहे.