पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सवासह सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातून नागरिकांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. शहरात यंदा आतापर्यंत 37 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली असून, या एका महिन्यात तब्बल 31 रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन महापालिका प्रशासनाने केलं आहे.यंदाच्या वर्षात जानेवारीमध्ये स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर जुलैमध्ये पाच, तर ऑगस्टमध्ये तब्बल 31 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
गेल्या काही वर्षांचा ट्रेंड काय सांगतो?
पिंपरी-चिंचवडमधील मागील काही वर्षांची आकडेवारी पाहिल्यास स्वाईन फ्लूचे रुग्ण यापूर्वीही मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. 2022 मध्ये 58 रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी ऑगस्ट महिन्यातच 34 रुग्ण आढळले होते. तर 2024 मध्ये शहरात 15 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती.त्यामुळे यंदा ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत झालेली वाढ लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून अनावश्यक घबराट निर्माण करण्याची गरज नसल्याचंही प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
गणेशोत्सवाच्या गर्दीत विशेष काळजी घ्या
गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो गर्दीची ठिकाणं टाळावीत, गर्दीत वावरताना मास्कचा वापर करावा आणि वारंवार हात स्वच्छ धुवावेत, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.सर्दी, खोकला किंवा ताप यांसारखी लक्षणं जाणवल्यास स्वतःहून औषधोपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
स्वाईन फ्लू नेमका कसा पसरतो?
स्वाईन फ्लू हा H1N1 प्रकारच्या इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. संक्रमित व्यक्तीच्या खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या थेंबांमधून हा विषाणू इतर व्यक्तींमध्ये पोहोचू शकतो. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे किंवा विषाणू लागलेल्या वस्तूंना स्पर्श केल्यानंतर नाक, तोंड किंवा डोळ्यांना हात लावल्यानेही संसर्ग होण्याची शक्यता असते.संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांत विषाणूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे लक्षणं दिसताच काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
ही लक्षणं दिसल्यास सावध व्हा
स्वाईन फ्लूमध्ये प्रामुख्याने ताप, सर्दी, घसा खवखवणे, सतत खोकला, नाक वाहणे, डोकेदुखी आणि प्रचंड थकवा अशी लक्षणं दिसू शकतात. काही रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांतून पाणी येणे, अतिसार तसेच न्यूमोनियासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
ज्येष्ठ आणि सहव्याधी असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी
ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंड किंवा यकृताचे विकार आणि श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
H1N1 सदृश लक्षणं आढळल्यास संबंधित व्यक्तीने इतरांपासून स्वतःला वेगळं ठेवावं आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून औषधं घेणं टाळावं, असा सल्लाही महापालिका प्रशासनाने दिला आहे.सणासुदीच्या काळात गर्दी वाढणार असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारीला प्राधान्य देणं, हीच स्वाईन फ्लूपासून बचावाची महत्त्वाची पायरी ठरणार आहे.