पुणे : पुणे महापालिकेच्या विकासकामांवर सोशल मीडिया आणि यू-ट्यूबच्या माध्यमातून सातत्याने प्रश्न उपस्थित करणारे यू-ट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. बुधवारी रात्री सुमारे एकच्या सुमारास पोलिसांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर पंडित यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, अटकेच्या वेळी घडलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ समोर आल्याने या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
रात्रीच्या सुमारास पोलिसांचे पथक घरी दाखल
प्राथमिक माहितीनुसार, संतोष पंडित यांनी कोथरूड परिसरातील विकासकामांबाबत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या व्हिडीओच्या माध्यमातून विकासकामांवर प्रश्न उपस्थित करताना आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री पंडित यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अटक केली.
पोलिसांच्या कारवाईचे कुटुंबीयांकडून चित्रीकरण
पंडित यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक दोन पांढऱ्या वाहनांमधून त्यांच्या घरी पोहोचले होते. पथकातील काही कर्मचारी साध्या वेशात असल्याचे सांगण्यात येत आहे.पोलिसांनी पंडित यांना वाहनात बसवण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण कारवाई मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. यावेळी संतोष पंडित यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देत “रात्री साडेबारा-एक वाजता आमच्या घरात पोलीस घुसतात. आमच्यासारख्यांची तीच लायकी आहे,” असे म्हटले.
“माझ्याकडून त्रास झाला असेल तर माफी मागतो”
अटकेच्या वेळी पंडित यांनी एका पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. “माझ्याकडून तुम्हाला त्रास झाला असेल, मी सहकार्य करत नसेन असं वाटत असेल तर माफी मागतो. अटक केल्याबद्दल धन्यवाद,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यानंतर पोलिसांच्या वाहनात बसण्यापूर्वी त्यांनी काही क्षण थांबण्याची विनंती केली. त्यांनी स्वतःचा मोबाईल, गाडीची किल्ली आणि कमरेचा बेल्ट काढून कुटुंबीयांकडे सोपवला. पोलिसांना कोणत्या वस्तूंची आवश्यकता नसते, याची आपल्याला माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले.या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संतोष पंडित यांच्याविरोधात कारवाईचे कारण काय?
संतोष पंडित हे पुणे महापालिकेच्या विकासकामांवर तसेच कामांमधील त्रुटींवर सोशल मीडियातून भाष्य करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि शिवराळ मजकूर असलेली व्हिडीओ क्लिप पोस्ट केल्याचा आरोप झाला होता.
या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून डेक्कन पोलिसांनी दोन संशयितांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्याचे सांगितले जाते.
संबंधित व्हिडीओमध्ये लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, केवळ राजकीय टीका न करता त्यामध्ये शिवीगाळ आणि असभ्य भाषेचा वापर केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता.दरम्यान, संतोष पंडित यांच्या अटकेनंतर या प्रकरणाकडे आता राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील पुढील कायदेशीर बाबी स्पष्ट होणार आहेत.