सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • माझे नेते 2029 पर्यंत मला महाराष्ट्रातच ठेवणार; माझा पक्ष ठरवेल त्या दिवशी जरूर मी दिल्लीला जाईन- देवेंद्र फडणवीस
  • पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पुण्यासारख्या ठिकाणी असे वाद योग्य नाहीत”
  • चिंताजनक! पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता धोका; ऑगस्टमध्येच 31 रुग्ण, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन
  • पुण्यात DJ वरून गोंधळ, नागपुरात मात्र ‘आवाजावर ब्रेक’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; DJ-डॉल्बीसह लेझर बीमवर बंदी
 जिल्हा

पुण्यात DJ वरून गोंधळ, नागपुरात मात्र ‘आवाजावर ब्रेक’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; DJ-डॉल्बीसह लेझर बीमवर बंदी

डिजिटल पुणे    03-09-2026 16:01:05

नागपूर : पुण्यात गणेशोत्सवातील डीजेच्या दणदणाटावरून वाद आणि चर्चांना उधाण आले असतानाच नागपूर पोलिसांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी आणि प्रकाश प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहरात डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम तसेच बीमलाईट आणि लेझर बीमलाईटच्या वापरावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी केली आहे.

ही बंदी ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते १ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे आगामी सण-उत्सव आणि मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर करण्यास आयोजकांना आळा बसणार आहे.

कोणत्या साऊंड सिस्टीमवर कारवाई?

पोलिसांच्या आदेशानुसार, वाहनांवर टॉप, मिड आणि बेस अशा मल्टीस्पीकर सिस्टीमचे थर रचून तयार करण्यात येणाऱ्या मॉडिफाईड साऊंड सिस्टीमवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासोबतच प्लाझ्मा साऊंड सिस्टीम, प्रेशर मिड सिस्टीम आणि वाहनांच्या मूळ रचनेत बदल करून उभारण्यात आलेल्या साऊंड सिस्टीमवरही कारवाई केली जाणार आहे.

अशा प्रकारच्या सिस्टीममुळे ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होण्याबरोबरच मिरवणुकांमध्ये मंडळांचे पदाधिकारी, आयोजक, राजकीय कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासन यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी आधीच कठोर भूमिका घेतली आहे.

नियमबाह्य वाहन थेट सील होणार

मॉडिफाईड किंवा मल्टी-लेयर साऊंड सिस्टीम घेऊन जाणारी वाहने आढळल्यास ती जागेवरच सीलबंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे उत्सवांच्या काळात डीजेच्या नावाखाली मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

सामान्य साऊंड सिस्टीमला काही प्रमाणात सूट

मात्र, सर्वच साऊंड सिस्टीमवर सरसकट बंदी घालण्यात आलेली नाही. शासनाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादेचे पालन करणाऱ्या आणि नियमांनुसार वापरल्या जाणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टीमला या आदेशातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचे पालन करून उत्सव साजरा करणाऱ्या आयोजकांना दिलासा मिळणार आहे.

लेझर आणि बीमलाईटवरही निर्बंध

पोलिसांच्या आदेशात केवळ मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीमच नव्हे, तर बीमलाईट आणि लेझर बीमलाईटच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तीव्र लेझर लाईटमुळे वाहनचालकांच्या दृष्टीवर परिणाम होऊन अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रकाश प्रदूषण रोखण्यासाठीही पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांना दिलासा

कर्णकर्कश आवाजाचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले आणि विद्यार्थ्यांना होतो. त्यामुळे उत्सव साजरा करण्याचा अधिकार जपतानाच नागरिकांच्या आरोग्याचा, शांततेचा आणि सुरक्षिततेचा विचार करणे आवश्यक असल्याचे पोलिसांच्या या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.

डीजे बंदीसाठी आधीपासूनच मागणी

नागपूरचे माजी महापौर आणि विधानपरिषदेचे माजी आमदार संदीप जोशी यांनीही शहरातील सण-उत्सवांमध्ये होणाऱ्या मोठ्या आवाजाच्या डीजेला विरोध केला आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजासोबतच लेझर लाईटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही धर्माचा उत्सव असो, तो पारंपरिक पद्धतीने आणि बँड, ढोल-ताशांच्या माध्यमातून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आगामी सणांपूर्वी पोलिसांचा ‘अॅक्शन मोड’

गोकुळाष्टमी, दहीहंडी, पोळा, तान्हापोळा, ताजुद्दीनबाबा उर्स, गणेशोत्सवातील आगमन-विसर्जन मिरवणुका, धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच दुर्गोत्सवातील मिरवणुका अशा विविध सणांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.एकीकडे पुण्यात डीजेच्या आवाजावरून वाद सुरू असताना नागपूर पोलिसांनी मात्र उत्सवांपूर्वीच नियम कडक करत ‘आवाजावर ब्रेक’ लावला आहे. आता या आदेशाची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते आणि नियम मोडणाऱ्यांवर नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बंदी असलेल्या प्रमुख गोष्टी :

- डॉल्बी साऊंड सिस्टीम

- प्लाझ्मा साऊंड सिस्टीम

- प्रेशर मिड सिस्टीम

- मॉडिफाईड साऊंड सिस्टीम असलेली वाहने

- बीमलाईट

- लेझर बीमलाईट


 Give Feedback



 जाहिराती