पुणे : गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी टिळक रोड परिसरात हल्ला झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधत असताना एका व्यक्तीने अचानक बापट यांच्या कानाखाली मारल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख संतोष चव्हाण अशी झाल्याची माहिती आहे. तो कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात असून, एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच, राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याचेही सांगितले जात आहे.
हल्ल्यानंतर संतोष चव्हाणची संतप्त प्रतिक्रिया
घटनेनंतर पोलिसांनी संतोष चव्हाणला अटक केली आहे. गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. अटकेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाणने बापट यांच्यावर केलेल्या हल्ल्याबाबत आक्रमक प्रतिक्रिया दिली.“तो टीका करतो, त्याला आणखी मारायला पाहिजे. त्याला सुट्टी देणार नाही, आणखी मारणार आहे. पुणे शहरातील गणेशोत्सवाबाबत जो बोलेल, त्याच्या अशाच कानाखाली मी मारणार,” असे चव्हाणने म्हटल्याचे समोर आले आहे.
हल्ल्यामागचा हेतू काय? पोलिसांचा तपास सुरू
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी चौकशी करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. संबंधित व्यक्ती बापट यांच्यावर हल्ला करण्यासाठी नेमकी कोणत्या उद्देशाने आली होती आणि हल्ल्यामागे कोणते कारण होते, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डीसीपी कृषीकेश रावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानंद बापट यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. बापट यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर बापट यांना सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे का, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची प्रतिक्रिया
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना अचानक आलेल्या व्यक्तीने आपल्यावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार सवंग प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
या घटनेचे व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे सांगत बापट यांनी पोलिसांनी फुटेजच्या आधारे कारवाई करावी, अशी मागणी केली. हल्लेखोराविरोधात कठोर कारवाईची मागणी करताना त्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, गणेशोत्सव साजरा करण्यास आपला विरोध नसल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होऊ नये आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, एवढीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादात आता मारहाणीची घटना घडल्याने पुण्यात या प्रकरणाची चर्चा रंगली असून, पोलिसांच्या तपासातून हल्ल्यामागील नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.