पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि ढोलवादनामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी पुण्यात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. टिळक रोडवरील कशाळे चौक परिसरात बापट माध्यमांशी संवाद साधत असताना एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणी संतोष चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, मत मांडताना एखाद्यावर हल्ला करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या भावना समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
“पुण्यासारख्या ठिकाणी असे वाद योग्य नाहीत”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला. उत्सवाची परंपरा आणि उत्साह कायम ठेवत ध्वनीप्रदूषणासह इतर अडचणी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी पहिल्याच वर्षी शंभर टक्के बदल होणार नसला तरी त्या दिशेने सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असेही फडणवीस म्हणाले.
नेमका हल्ला कसा झाला?
विद्यानंद बापट हे माध्यमांशी बोलत असताना संतोष चव्हाण नावाचा तरुण तिथे आला. त्याने बापट यांच्या कानशिलात मारल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि इतरांनी तत्काळ हस्तक्षेप करत चव्हाणला बाजूला केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भूमिका
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात अशा प्रकारची हिंसक घटना घडणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहनही त्यांनी केले.तसेच कोणत्याही व्यक्तीच्या वक्तव्यावर आक्षेप असल्यास कायदेशीर मार्गाने तक्रार करता येते; मात्र हिंसाचाराला थारा दिला जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. विद्यानंद बापट यांना पोलीस सुरक्षा देण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. दरम्यान, बापट यांच्या विरोधातही पोलिसांकडे एक अर्ज प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हल्ल्यानंतर बापट काय म्हणाले?
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांनी माध्यमांशी बोलताना हा हल्ला प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचा आरोप केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही आणि व्हिडीओ फुटेज तपासून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
गणेशोत्सव साजरा करण्यास आपला विरोध नसून, सार्वजनिक उत्सवाच्या वेळी ध्वनीप्रदूषण होऊ नये आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.
आधीही झाला होता विरोध
विद्यानंद बापट यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केला होता. त्यांच्या भूमिकेमुळे काही गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींनी नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळीही पालिकेच्या सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्यांना सभागृहाबाहेर नेण्यात आले होते. आता थेट त्यांच्यावर हल्ला झाल्याने या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा राज्यभर सुरू झाली आहे.दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याच्या प्रकरणात संतोष पंडित यांच्या अटकेबाबतही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या प्रकरणावर फडणवीस यांनी भाष्य केले नाही.