मावळ : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे अवघ्या २ वर्षे १० महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी ५१ वर्षीय बाळू नामदेव असवले याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आईस्क्रीमचं आमिष दाखवून चिमुकलीला नेले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१ सप्टेंबर) सकाळी ११ ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास टाकवे बुद्रुक येथे ही घटना घडली. आरोपीने चिमुकलीला आईस्क्रीम देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला एका दूध डेअरीच्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
चिमुकलीने आईला सांगितला धक्कादायक प्रकार
अत्याचारानंतर चिमुकलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने गुरुवारी (३ सप्टेंबर) वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बाळू नामदेव असवले याला अटक केली.
८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
अटकेनंतर आरोपीला वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या या अत्याचारामुळे मावळ परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.