सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • देव तारी त्याला कोण मारी! ना अन्न ना पाणी, तब्बल 9 दिवस मृत्यूशी झुंज, महापुरात अडकलेल्या 2 जणांची सुटका
  • ‘विद्यानंद बापटांची भूमिका योग्य’; डीजेच्या मुद्द्यावर शरद पवारांचा मोठा दावा, हल्लेखोरांनाही सुनावलं
 क्राईम

अभ्यास अन् परीक्षेचं टेन्शन; बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या, चौथ्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवलं

डिजिटल पुणे    04-09-2026 13:24:36

बारामती : अभ्यास आणि परीक्षेच्या तणावातून 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील भिगवण रोड परिसरात शुक्रवारी (4 सप्टेंबर 2026) पहाटे घडली. निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. घटनेनंतर तिला गंभीर जखमी अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी बारामती शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. गेल्या काही दिवसांपासून अभ्यास आणि परीक्षेचा ताण असल्याचे ती आपल्या आई-वडिलांना सांगत होती. अभ्यास पूर्ण होत नसल्याची चिंता तसेच परीक्षेचे टेन्शन येत असल्याचेही ती पालकांशी बोलत होती, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.

रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला; त्यानंतर टेरेसवर गेली

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनी रात्री सुमारे 12.30 वाजेपर्यंत अभ्यास करत होती. त्यानंतर टेरेसवर जाऊन येते, असे सांगून ती इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेली.बराच वेळ उलटूनही ती खाली न आल्याने तिचे वडील तिला पाहण्यासाठी टेरेसवर गेले. त्यावेळी विद्यार्थिनी टेरेसवर असल्याचे त्यांना दिसले. वडिलांनी तिला आवाज दिल्यानंतर काही क्षणांतच तिने चौथ्या मजल्यावरून खाली उडी घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल; उपचारादरम्यान मृत्यू

इमारतीवरून खाली पडल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. घटनेनंतर आई-वडील आणि शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.उपचार सुरू असताना काही काळ ती शुद्धीवर होती. यावेळी तिने आईकडे पिण्यासाठी पाणी मागितल्याची माहिती पालकांनी पोलिसांना दिली. मात्र त्यानंतर तिची प्रकृती अधिक गंभीर झाली आणि पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

आत्महत्येमागे नेमकं कारण काय?

अभ्यास आणि परीक्षेचा ताण हे आत्महत्येमागील प्राथमिक कारण असल्याची माहिती विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांना दिली आहे. मात्र केवळ हाच कारणीभूत घटक होता का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.

या घटनेमागे वैयक्तिक, शैक्षणिक, कौटुंबिक किंवा अन्य कोणते कारण होते का? विद्यार्थिनीवर कोणाचा दबाव किंवा मानसिक त्रास होता का? यासह सर्व शक्यता पोलिसांकडून तपासल्या जात आहेत. सध्या कुटुंबीयांनी कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तक्रार किंवा संशय व्यक्त केलेला नसल्याची माहिती आहे.

यापूर्वीही घरातून निघून गेल्याची नोंद

पोलिस तपासात संबंधित विद्यार्थिनी यापूर्वीही घरातून निघून गेल्याची नोंद बारामती शहर पोलीस ठाण्यात झाल्याचे समोर आले आहे. या पूर्वीच्या घटनेशी संबंधित कागदपत्रे, जबाब आणि तपासातून समोर आलेल्या बाबींची सध्याच्या आत्महत्येच्या घटनेशी संबंधित पडताळणी केली जात आहे.तसेच विद्यार्थिनीकडे स्वतःचा वैयक्तिक मोबाईल फोन नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. ती आवश्यकतेनुसार आई-वडिलांच्या मोबाईलचा वापर करत होती. त्यामुळे संबंधित मोबाईलमधील उपलब्ध डिजिटल माहितीचीही कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी करण्यात येणार आहे.

सीसीटीव्हीपासून जबाबांपर्यंत पोलिसांकडून तपास

बारामती शहर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पंचनामा करण्यात आला आहे. परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय कागदपत्रे आणि डिजिटल माहिती तपासली जात आहे. तसेच पालक, नातेवाईक, मैत्रिणी, सहाध्यायी, शिक्षक आणि इतर संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत.

या प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.अल्पवयीन विद्यार्थिनीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी तिचे नाव, छायाचित्र किंवा ओळख पटेल अशी कोणतीही वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन बारामती शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती