नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी निघालेल्या एका 17 वर्षीय युवतीचा एसटी बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नाशिकच्या ठक्कर बाजार बसस्थानकात घडली. रविवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेने बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.
मृत युवतीचे नाव आकांक्षा रामभाऊ शेलार (वय 17) असे आहे. आकांक्षा आपल्या कुटुंबीयांसह त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात आली होती. रात्रीच्या वेळी बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी झाली होती.
बस पकडण्यासाठी प्रवाशांची लगबग सुरू असताना झालेल्या गर्दीत आकांक्षाला अचानक जोराचा धक्का लागला. त्यामुळे तिचा तोल जाऊन ती खाली पडली. त्याचवेळी स्थानकातून पुढे जाणाऱ्या एसटी बसचे मागील चाक तिच्या अंगावरून गेले. या भीषण अपघातात आकांक्षाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
रिक्षातून जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले
घटना घडल्यानंतर आकांक्षाच्या चुलत भावाने तातडीने तिला रिक्षातून नाशिक जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
लेकीचा अपघात पाहून आईला बसला मोठा धक्का
आकांक्षाचा अपघात आणि त्यानंतरचा मृत्यू पाहून तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. लेकीच्या डोळ्यांसमोर झालेल्या या भीषण अपघातामुळे तिच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला आणि त्या घटनास्थळीच भोवळ येऊन पडल्या.
अपघातप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू
या घटनेनंतर नाशिक पोलिसांकडून अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. एसटी बसचालकाच्या निष्काळजीपणाबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, प्रवाशांची झालेली अतिगर्दी आणि त्यातून झालेल्या लोटालोटीमुळे हा अपघात घडल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत असून, गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.