कोची : कोचीहून अबू धाबीच्या दिशेने उड्डाण केलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात हवेत असताना तांत्रिक अडचण निर्माण झाली. विमान तब्बल 36 हजार फूट उंचीवर असताना इंजिनमधील तेलाचा दबाव कमी होत असल्याचा अलर्ट मिळाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत क्रू मेंबर्सने तातडीने निर्णय घेत विमानाचा मार्ग बदलला आणि ते पुन्हा कोचीच्या दिशेने वळवण्यात आले. त्यानंतर विमानाचे कोची विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसचे बोईंग 737 (IX 415) हे विमान कोचीहून अबू धाबीला जाण्यासाठी रवाना झाले होते. उड्डाणानंतर सुमारे 50 मिनिटांनी विमानातील क्रूच्या निदर्शनास इंजिन क्रमांक 1 मधील तेलाचा दबाव कमी होत असल्याचे आले. तेलाचा दबाव सातत्याने कमी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित इंजिनचा तेलपुरवठा बंद करण्यात आला.
36 हजार फूट उंचीवर बदलला विमानाचा मार्ग
विमान त्यावेळी सुमारे 36 हजार फूट उंचीवर होते. इंजिनशी संबंधित समस्या लक्षात आल्यानंतर अबू धाबीचा प्रवास सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते, असा अंदाज घेत क्रूने विमान कोचीला परत नेण्याचा निर्णय घेतला. विमानाने आपला मार्ग बदलत पुन्हा भारताच्या दिशेने प्रवास केला आणि कोची विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले.या घटनेत विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. लँडिंगनंतर विमानाचे पुन्हा उड्डाण करण्यात आले नसल्याची माहिती आहे.
FORDEC प्रक्रियेतून परिस्थितीचे मूल्यांकन
इंजिनमधील तेलाच्या समस्येची माहिती मिळाल्यानंतर क्रू मेंबर्सने FORDEC प्रक्रियेचा वापर करून परिस्थितीचे मूल्यांकन केले. विमानाची सुरक्षितता आणि प्रवाशांचा जीवितहानीचा धोका टाळण्यासाठी अबू धाबीऐवजी कोचीला परतण्याचा निर्णय घेण्यात आला.क्रूने वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे मानले जात आहे. मात्र, इंजिनमधील तेलाचा दबाव नेमका कोणत्या कारणामुळे कमी झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनेची चौकशी सुरू
या तांत्रिक बिघाडामागील नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी केली जात आहे. विमानातील समस्या नेमकी कशामुळे निर्माण झाली आणि त्यासाठी कोणती बाब जबाबदार आहे, हे तपासानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.दरम्यान, या घटनेबाबत एअर इंडिया एक्स्प्रेस किंवा विमानतळ प्राधिकरणाकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.