पुणे/पिंपरी : महापारेषणच्या चिंचवड येथील 220 केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड होऊन स्फोट झाल्याची घटना रविवारी (6 सप्टेंबर) दुपारी घडली. स्फोटानंतर उपकेंद्रात आग लागल्याने पिंपरी-चिंचवडसह पुण्याच्या काही भागातील वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. या बिघाडामुळे पिंपरी-चिंचवडमधील सुमारे 2 लाख 60 हजार, तर पुण्यातील जवळपास 50 हजार ग्राहकांना वीजखंडित होण्याचा फटका बसला.
उपकेंद्रात स्फोटानंतर आगीचे लोळ
चिंचवड वीज उपकेंद्रातील 22 केव्ही करंट ट्रान्सफॉर्मर (CT) आणि सर्किट ब्रेकरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर स्फोट झाला. त्यानंतर मोठी आग लागून परिसरात धुराचे लोट पसरले. आगीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.या घटनेचा परिणाम चिंचवड, निगडी, रावेत, प्राधिकरण, काळेवाडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी यांसह अनेक भागांवर झाला.
पुण्यातील अनेक भागांतील वीजपुरवठाही विस्कळीत
या तांत्रिक बिघाडामुळे शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर गावठाण, मॉडेल कॉलनी आणि बालगंधर्व रंगमंदिर परिसरातील वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला.दुपारी तीननंतर पुण्यातील अनेक भागांत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र, निगडी आणि चिंचवड परिसरात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. थेरगावच्या काही भागांत सायंकाळी साडेसातच्या सुमारास वीज आली. चिंचवडगाव परिसरात काही काळ वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर पुन्हा खंडित झाला.
PMPच्या 70 ई-बसच्या फेऱ्यांवर परिणाम
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे PMPच्या ई-बसचे चार्जिंग करता आले नाही. परिणामी सुमारे 70 ई-बसची सेवा प्रभावित झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
आठ मेट्रो गाड्या 22 मिनिटे जागीच थांबल्या
वीजपुरवठा खंडित झाल्याचा थेट परिणाम पुणे मेट्रोच्या पर्पल लाइनवरही झाला. जिल्हा न्यायालय ते पिंपरी-चिंचवड या मार्गावरील मेट्रो सेवा सुमारे 22 मिनिटे विस्कळीत झाली. या कालावधीत तब्बल आठ मेट्रो गाड्या जागीच थांबल्या.
वीजपुरवठा बंद झाल्याने काही मेट्रो स्थानकांवरील सरकते जिने आणि विद्युत यंत्रणाही बंद पडली. मेट्रो प्रशासनाने तातडीने पर्यायी विद्युतपुरवठ्याची व्यवस्था केली. दुपारी 12.47 वाजता वनाज उपकेंद्रातून पर्पल लाइनला वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर थांबलेल्या सर्व मेट्रो गाड्यांनी पुन्हा प्रवास सुरू केला. दुपारी 1.06 वाजता स्थानकांवरील विद्युत उपकरणेही पूर्ववत झाली.
तळेगाव आणि आंबेठाणलाही वीजबिघाडाचा फटका
चिंचवड उपकेंद्रातील बिघाडाचा परिणाम तळेगाव आणि आंबेठाण येथील 132 केव्ही उपकेंद्रांवरही झाला. तळेगाव शहरातील घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी वाहिनीद्वारे खोपोलीतून पूर्ववत करण्यात आला. मात्र, औद्योगिक वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.आंबेठाण उपकेंद्राचा वीजपुरवठा दुपारी 12.25 वाजता खंडित झाला होता. तो सायंकाळी 4.20 वाजता पूर्ववत करण्यात आला. या बिघाडाचा अंदाजे 1,500 उद्योगांना फटका बसला.
दुकानदार आणि ग्राहकांचीही गैरसोय
दुपारपासून वीज नसल्याने बाजारपेठेतील व्यवहारांवरही परिणाम झाला. गर्दीच्या वेळेत दुकानदारांना ग्राहकांना वस्तू दाखवण्यात अडचणी येत होत्या. काही ग्राहकांनी साहित्य पाहून खरेदी न करताच परत जाणे पसंत केले.गणेशोत्सवासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात आलेल्या ग्राहकांनाही वीज नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून आले.
तांत्रिक तपासणीनंतर कारण स्पष्ट होणार
चिंचवड वीज उपकेंद्रातील तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने रोहित्राचे नुकसान झालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून, त्यानंतर स्फोटामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.