सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून परवानगीपेक्षा डबल साऊंड लावल्याने मंडळावर कारवाई; साऊंड सिस्टिमही जप्त
  • दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यात कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, जुन्या सांगवीतील खळबळजनक घटना
 शहर

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश; ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, राजकीय नेत्यांचीही उपस्थिती

डिजिटल पुणे    07-09-2026 17:18:07

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज पुण्यात आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. पेपरफुटी, परीक्षा प्रक्रिया, भरतीतील विलंब, निकाल आणि परीक्षांशी संबंधित विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे.

ओंकारेश्वर मंदिरापासून मोर्चाला सुरुवात

आज सकाळी १० वाजता पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरापासून MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला आहे. विद्यार्थ्यांकडून विविध मागण्यांच्या घोषणा देत सरकारकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे.

पेपरफुटीपासून भरती प्रक्रियेपर्यंत अनेक प्रश्न

MPSCच्या माध्यमातून राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. मात्र, परीक्षा वेळापत्रकातील बदल, भरती प्रक्रियेला होणारा विलंब, निकालासंबंधीचे प्रश्न, पेपरफुटीचे आरोप आणि परीक्षांशी संबंधित इतर अडचणींमुळे उमेदवारांमध्ये नाराजी असल्याचे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.या सर्व प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका घेत प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीचे नेतेही मोर्चात

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीतील काही राजकीय नेतेही मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यामुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग मिळण्याची शक्यता असून या मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देणार

मोर्चानंतर विद्यार्थ्यांकडून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले जाण्याची शक्यता आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.

सरकारच्या भूमिकेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

MPSC विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे आता पुण्यासह राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे. आजच्या मोर्चानंतर सरकारकडून या प्रश्नांवर कोणती भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती