सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 क्राईम

पुणे रेल्वे स्थानकात पोलीस शिपायावर कोयत्याने हल्ला; गांजा पिणाऱ्यांना हटकणे पडले महागात, गळ्यावर वार करून मोबाईल-चैन लुटली

डिजिटल पुणे    08-09-2026 13:04:32

पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर काही जणांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे रुळांवर गांजा पिणाऱ्या टोळक्याला हटकणे पोलीस शिपाई अक्षय बोंबाळे यांना चांगलेच महागात पडले. आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस शिपाई अक्षय बोंबाळे हे पुणे रेल्वे स्थानक परिसरात कर्तव्यावर होते. त्यावेळी काही जण रेल्वे रुळांच्या परिसरात गांजा पित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बोंबाळे यांनी या टोळक्याला हटकत तेथून जाण्यास सांगितले. मात्र, याचा राग आल्याने आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

दोन साथीदारांनी पकडले, एकाने गळ्यावर वार केला

हल्ल्यादरम्यान आरोपींच्या दोन अज्ञात साथीदारांनी पोलीस कर्मचाऱ्याचे हात-पाय घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर विकी नावाच्या आरोपीने धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार केला. तर रॉकीने त्यांच्या छातीवर वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात अक्षय बोंबाळे गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेतही लुटले

हल्ल्यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. जखमी पोलीस कर्मचाऱ्याजवळील मोबाईल फोन तसेच गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस कर्मचारी पडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

बंडगार्डन पोलिसांकडून आरोपींचा शोध

या घटनेप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील माहिती आणि उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत.

थेट पोलिसांवर हल्ल्याने खळबळ

पुण्यात कोयता आणि धारदार शस्त्रांचा वापर करून हल्ल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. मात्र, आता कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच जीवघेणा हल्ला झाल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पोलिसांवरच हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याने या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती