पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला वर्गातील विद्यार्थी कु. प्रतिक भांगरे याने रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, येथील ‘कवयित्री बहिणाबाई वाङ्मय मंडळा’च्या वतीने आयोजित मराठी, हिंदी व इंग्रजी काव्य मैफिल स्पर्धेत आपल्या प्रतिभावान आणि आशयगर्भ काव्य सादरीकरणाने प्रथम क्रमांक पटकावला.
प्रतिक भांगरे याने “महाराष्ट्र अजून आम्हाला कळलाच नाही?” ही स्वरचित कविता अत्यंत प्रभावी, ओजस्वी आणि संवेदनशील पद्धतीने सादर केली. महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक जडणघडण, समकालीन वास्तव आणि समाजमनातील विविध प्रश्नांना भिडणाऱ्या या कवितेच्या आशयपूर्ण मांडणीने परीक्षकांची व रसिकांची विशेष दाद मिळवली. त्याच्या सादरीकरणातील विचारांची धार, भावनांची खोली, शब्दफेक आणि प्रभावी अभिव्यक्ती यामुळे त्याने स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले.
प्रतिकच्या या उल्लेखनीय यशामुळे बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवत्तेला आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे. त्याच्या सर्जनशील लेखणीला मिळालेली ही दाद म्हणजे त्याच्या साहित्यिक प्रतिभेला मिळालेली मानाची पावती असल्याची भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी व्यक्त करत या यशाबद्दल प्रतिकचा सत्कार केला. तसेच साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्याने भविष्यातही उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॅा. चंदा हसे, मराठी विभाग प्रमुख डॉ. विजय बालघरे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीषा शेवाळे, भूगोल विभाग प्रमुख डॉ. रमाकांत कसपटे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुदर्शन लखदिवे, प्रा. शर्मिला देवकाते, डॉ. मनीषा खैरे, प्रा. नूतन लोणकर-नेवसे, डॉ. अपेक्षा नाकतोडे हे उपस्थित होते.