मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असून, या प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढला. या आंदोलनात आमदार रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील काही नेते सहभागी झाले होते. यावेळी MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, आपल्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना विवेक भीमनवार यांनी, “माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर एक क्षणसुद्धा मी या पदावर राहणार नाही,” असे म्हटले होते. आता रोहित पवार यांनी भीमनवार यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातील तक्रारींची कागदपत्रे समोर आणत त्यांच्या राजीन्याची मागणी पुन्हा लावून धरली आहे.
‘संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीवर साधा आरोपही नसावा’
रोहित पवार यांनी MPSC अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचे आणि संवैधानिक पद असल्याचे म्हटले आहे. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीविरोधात केवळ पुरावे नसणे पुरेसे नाही, तर साधा आरोपही होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.“भीमनवार साहेबांच्या कार्यकाळात झालेल्या कथित पेपरफुटीमुळे विद्यार्थी राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित आहे,” असे रोहित पवार यांनी म्हटले.
परिवहन आयुक्त असतानाच्या तक्रारींचा दाखला
भीमनवार परिवहन आयुक्त असताना त्यांच्या विभागातील एका आरटीओ अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारींचा दाखला रोहित पवार यांनी दिला आहे. वाहन खरेदीच्या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन करून विशिष्ट कंपनी किंवा व्यक्तींच्या समूहाला फायदा मिळवून दिल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.तक्रारीत नमूद केल्यानुसार, वाहन खरेदीशी संबंधित तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचा अनुभव असलेल्या एजन्सी केंद्र सरकारच्या GeM पोर्टलवर उपलब्ध असतानाही ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली, असा आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच, एका विशिष्ट कंपनीला फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने कथितरित्या कार्यादेश देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
‘संगनमत आणि आर्थिक हितसंबंधांचा आरोप’
तक्रारीनुसार, तत्कालीन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि परिवहन विभागातील अन्य अधिकाऱ्यांनी संगनमत केल्याचा आरोप करण्यात आला होता. सरकारी GeM पोर्टलवर उपलब्ध असलेल्या उपकरणांची खरेदी न करता विशिष्ट उद्योगसमूहाला फायदा मिळवून देण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात आल्याचा दावाही या तक्रारीत करण्यात आल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात व्यावसायिक मक्तेदारी, कथित लबाडी आणि अनुचित आर्थिक लाभ मिळवून देण्याचा आरोप करण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले. मात्र, हे आरोप संबंधित तक्रारीत करण्यात आलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘हा फक्त ट्रेलर; पूर्ण पिक्चर लवकरच’
दरम्यान, रोहित पवार यांनी या मुद्द्यावरून MPSC अध्यक्षांना थेट इशारा दिला आहे. “हा फक्त ट्रेलर आहे. पूर्ण पिक्चर लवकरच दाखवतो,” असे म्हणत त्यांनी आणखी कागदपत्रे समोर आणण्याचे संकेत दिले.
बदल्या, पदोन्नती, ओव्हरलोड वाहनांच्या याद्या तसेच वरळी वाहनखरेदी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीसह आणखी अनेक मुद्दे असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.त्यामुळे MPSC परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्याबरोबरच आता विवेक भीमनवार यांच्या पूर्वीच्या प्रशासकीय कार्यकाळातील तक्रारींचाही मुद्दा चर्चेत आला आहे. या सर्व आरोपांवर संबंधितांकडून पुढील काळात काय भूमिका घेतली जाते, याकडे आता विद्यार्थ्यांसह राज्याचे लक्ष लागले आहे.