मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे. ब्रिटनच्या संसदेत ९ आणि १० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये शिंदे यांचा तीन पुरस्कारांनी गौरव केला जाणार आहे. यामध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’, ‘स्टेटसमनशिप अवॉर्ड’ आणि ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्कारांचा समावेश आहे.दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यासाठी एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्यात ब्रिटिश संसदेसह लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप’ सन्मान
यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबरला ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी राबविलेल्या नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीची या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली आहे. विशेषतः लोककल्याणकारी योजना आणि त्यांची नागरिकांपर्यंत पोहोच यासाठी हा सन्मान दिला जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
‘लाडकी बहीण’सह तीन योजनांची विशेष दखल
शिंदे यांना देण्यात येणाऱ्या या सन्मानामागे त्यांच्या कार्यकाळातील तीन महत्त्वाच्या योजनांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना — महिलांना आर्थिक आधार देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेली योजना.
शासन आपल्या दारी — सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना वारंवार जावे लागू नये आणि विविध शासकीय सेवा त्यांच्या जवळ पोहोचाव्यात, यासाठी राबविण्यात आलेला उपक्रम.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना — तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देतानाच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देणारी योजना.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, या पुरस्कारासाठी प्रशासकीय कार्यक्षमता, महिला सक्षमीकरण आणि थेट लाभ हस्तांतरण या तीन प्रमुख बाबींचा विचार करण्यात आला आहे.
ब्रिटनमधील मुलांच्या चित्रांमधून महाराष्ट्राच्या योजनांचे दर्शन
या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने ‘कॅनव्हास फॉर केअर’तर्फे संसदीय कला प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. ब्रिटनमधील मुलांनी महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण योजना’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या योजनांच्या संकल्पनेवर काढलेली चित्रे या प्रदर्शनात मांडली जाणार आहेत.
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये महाराष्ट्राचे विकास व्हिजन मांडणार
१० सप्टेंबरला ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६ : ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉग’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इंडो-युरोपियन बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.या परिषदेसाठी एकनाथ शिंदे यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात त्यांना ‘स्टेटसमनशिप अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.
नगरविकास, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांवर भर
महाराष्ट्राच्या आर्थिक क्षमतेसह राज्यातील विकासकामांचे व्हिजन शिंदे या परिषदेत मांडणार आहेत. तसेच नगरविकास, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रातील कामगिरीविषयीही ते आपले विचार व्यक्त करणार आहेत.भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक संबंध, व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी यावरही या परिषदेत चर्चा होणार आहे. ब्रिटिश संसदेतील सदस्य, वरिष्ठ मंत्री, महापौर, राजदूत, उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडूनही विशेष गौरव
लंडन दौऱ्यात एकनाथ शिंदे महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र भवनाला भेट देणार आहेत. सुमारे ९४ वर्षांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्र मंडळाच्या वतीने त्यांना ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यासह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार दिला जाणार आहे.
दोन दिवसांत तीन सन्मान
एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यात ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्टेटसमनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र मंडळातर्फे ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र अशा तीन पुरस्कारांनी त्यांचा गौरव होणार आहे. त्यामुळे शिंदे यांच्या या लंडन दौऱ्याकडे राजकीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.