पुणे : कात्रज परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. माया रेड्डी असे मृत तरुणीचे नाव असून, ती मूळची हैदराबाद येथील रहिवासी होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भारती विद्यापीठात एमबीबीएसचे शिक्षण
माया रेड्डी पुण्यात वैद्यकीय शिक्षणासाठी राहत होती. कात्रज येथील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयात ती एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकत होती. शिक्षणासाठी ती कात्रज परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये वास्तव्यास होती.
दुपारी घडली दुर्दैवी घटना
बुधवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास माया इमारतीच्या नवव्या मजल्यावरून खाली पडल्याची घटना घडली. घटनेचा आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी आणि सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.माया रेड्डीने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अभ्यासाचा ताण, वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारण यापैकी काही कारण होते का, याचा पोलीस तपास करत आहेत. तिचा मोबाईल फोन तपासण्यात येत असून, मित्र-मैत्रिणी आणि संबंधित व्यक्तींकडेही चौकशी केली जात आहे.