सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 विश्लेषण

‘प्रसाद ओक म्हणजे धर्मवीर आनंद दिघे’; फडणवीसांच्या कौतुकाने भारावला अभिनेता, हात जोडून मानले आभार

डिजिटल पुणे    10-09-2026 11:24:41

मुंबई : 62वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात दिमाखात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकार आणि मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना ‘राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’, तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना ‘राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सलीम खान सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नी अभिनेत्री हेलन यांनी त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद ओक यांच्या अभिनय कारकिर्दीचे विशेष कौतुक केले. प्रसाद ओक हे केवळ अभिनेते नसून दिग्दर्शक आणि विविध क्षेत्रांत प्रभावी काम करणारे अष्टपैलू कलाकार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

विष्णुपंत पागनीस म्हणजे संत तुकाराम, निळू फुले म्हणजे इरसाल राजकारणी आणि आता प्रसाद ओक म्हणजे धर्मवीर आनंद दिघे’, अशा शब्दांत फडणवीस यांनी प्रसाद ओक यांच्या ‘धर्मवीर’ चित्रपटातील भूमिकेचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने प्रसाद ओक भावूक झाले आणि त्यांनी उभे राहून हात जोडत फडणवीसांचे आभार मानले.

प्रसाद ओक यांनी ‘धर्मवीर’मध्ये साकारलेली आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावी आणि हुबेहूब असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ज्यांनी आनंद दिघे यांना प्रत्यक्ष पाहिले नाही, त्यांच्यासाठी प्रसाद ओक यांनी साकारलेली प्रतिमाच कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले.

प्रसाद ओक यांनी आतापर्यंत सुमारे 125 चित्रपटांमध्ये काम केल्याचा उल्लेख करताना फडणवीसांनी मिश्कील शैलीत त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘एवढ्या लवकर तुम्हाला जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार नाही; अजून अनेक पुरस्कार तुम्हाला स्वीकारायचे आहेत,’ असे म्हणत त्यांनी प्रसाद ओक यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी फडणवीस यांनी मराठी चित्रपटांच्या यशाचाही उल्लेख केला. ‘देऊळ बंद’ चित्रपटाने विविध विक्रम नोंदवत असल्याचे सांगत मराठी चित्रपट 100 कोटींच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे ही संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले.

आधुनिक सुविधांनी सुसज्ज चित्रनगरी उभारण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटसृष्टीची गुणवत्ता कायम ठेवत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज चित्रनगरी विकसित करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक आधुनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि विविध प्रकारचे सेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे.

तसेच मराठी चित्रपटांना अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध व्हावीत यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची खरी ताकद असल्याचे सांगत, देशातील दर्जेदार चित्रपटांमध्ये मराठी सिनेमांचा समावेश होतो, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मराठी रंगभूमीने आपली समृद्ध परंपरा आणि प्रतिष्ठा कायम राखली असून याच भक्कम पायावर मराठी चित्रपटसृष्टी सातत्याने नवी उंची गाठत असल्याचे त्यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती