पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. उत्सवाच्या काळात मध्यवर्ती पुण्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान काही प्रमुख रस्त्यांवर जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला २४ तास बंदी घालण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी खरेदी करण्याबरोबरच शहरातील विविध गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हे नियोजन केले आहे.
‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
शास्त्री रोडवरील सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक, टिळक रोडवरील जेधे चौक ते अलका चौक आणि कुमठेकर रोडवरील शनिपार ते अलका चौक या मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.यासोबतच लक्ष्मी रोडवरील संत कबीर चौक ते अलका चौक, केळकर रोडवरील फुटका बुरुज ते अलका चौक, बाजीराव रोडवरील पुरम चौक ते गाडगीळ पुतळा आणि शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा ते जेधे चौक या मार्गांवरही निर्बंध लागू असतील.
कर्वे रोडवरील नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रोडवरील खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक तसेच जंगली महाराज रोडवरील स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक या मार्गांवरही जड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.
याशिवाय सिंहगड रोडवरील राजाराम ब्रिज ते सावरकर चौक आणि गणेश रोड/मुदलियार रोडवरील पॉवरहाऊस, दारुवाला जिजामाता चौक ते फुटका बुरुज चौक या मार्गांवरही अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरणात उत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.