सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 क्राईम

मैत्रिणीशी बोलल्याचा संशय अन् तरुणाचे अपहरण; 112 वर कॉल, 53 मिनिटांत पोलिसांनी केली सुटका

डिजिटल पुणे    10-09-2026 15:39:21

पुणे : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या संशयातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. पेरूगेट पोलीस चौकीच्या हद्दीत हा प्रकार घडला. अपहरणाची माहिती डायल 112 वर मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि अवघ्या 53 मिनिटांत तरुणाची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, अन्य दोन आरोपी फरार आहेत.

प्रसाद सूर्यवंशी (वय 28) असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून प्रसादला जबरदस्तीने घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करत वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली. रात्री 1 वाजून 23 मिनिटांनी सिंहगड रोडच्या दिशेने जात असताना पोलिसांनी प्रसादची सुटका केली.

या प्रकरणी सागर रमेश बोराडे (वय 32) आणि किशोर बाळासाहेब सावंत (वय 32) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांचे अन्य दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुटका झाल्यानंतर प्रसादची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

महिला परिचितेशी बोलण्यावरून संशय

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रसाद आणि आरोपी सागर बोराडे यांची एक महिला परिचित आहे. दोघेही पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याची माहिती आहे. प्रसाद या महिलेशी बोलत असल्याच्या संशयातून सागरने साथीदारांच्या मदतीने त्याचे अपहरण केल्याचा आरोप आहे.

आरोपींनी प्रसादला मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवले आणि त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. प्रसादने प्रसंगावधान राखत मित्रांना आणि क्लास परिसरातील व्यक्तींना पोलिसांना माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर डायल 112 वर कॉल करण्यात आला आणि पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.

‘सिंहगड रोडवर नेऊनही मारहाण केली’

घटनेबाबत प्रसादने माध्यमांशी बोलताना आरोपींपैकी कोणालाही आपण ओळखत नसल्याचे सांगितले. रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान काही जणांनी आपल्याला अडवून मारहाण केली आणि जबरदस्तीने गाडीत बसवल्याचे त्याने सांगितले.

आरोपींनी आपल्याला सिंहगड रोडच्या दिशेने नेले. तेथेही मारहाण करण्यात आली, असा दावा प्रसादने केला. दरम्यान, आपल्या मित्रांनी आणि क्लासजवळील मुलींनी पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसांनी तत्काळ मदत केली आणि आपली सुटका झाली, असे त्याने सांगितले.

‘त्या मुलीशी माझा कोणताही संबंध नाही’

आपला संबंधित मुलीसोबत कोणताही संबंध नसल्याचे प्रसादने स्पष्ट केले. रूम पार्टनरच्या पीजीमध्ये अनेक मुली राहत असून, अभ्यासाच्या संदर्भात त्यांच्याशी सामान्य संवाद होत असल्याचे त्याने सांगितले.ज्या मुलीच्या संदर्भातून हा प्रकार घडला, ती आपली मैत्रीण नसून केवळ ओळखीची व्यक्ती आहे, असा दावा प्रसादने केला. यापूर्वी गाडी पार्किंगच्या एका विषयावर तिला फोटो पाठवून विचारणा केली होती. त्याच कारणावरून तिचे आणि आरोपीचे वाद झाले होते, असेही त्याने सांगितले.या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आपले कॉल रेकॉर्ड, मेसेज आणि सीडीआर तपासले जाऊ शकतात. याबाबत पोलिसांना आवश्यक माहिती दिल्याचेही प्रसादने सांगितले.

‘पोलीस वेळेत आले नसते तर मोठा अनर्थ झाला असता’

‘मला तुझ्याशी बोलायचे आहे,’ असे सांगून आरोपी आपल्याला जबरदस्तीने घेऊन जात होते आणि सतत धमक्या देत होते, अशी आपबिती प्रसादने सांगितली. पोलीस वेळेत पोहोचले नसते तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती, अशी भीती त्याने व्यक्त केली.दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे अवघ्या 53 मिनिटांत तरुणाची सुटका झाल्याने मोठा अनर्थ टळला.


 Give Feedback



 जाहिराती