लंडन : ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. यावेळी शिंदे यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून भाषण करत महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका मांडली.
भाषणाची सुरुवात ‘नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र’ आणि *‘जय भवानी, जय शिवाजी’*च्या घोषणांनी करत शिंदे यांनी ब्रिटनच्या संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद केला. ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ या कवी सुरेश भट यांच्या ओळींचा उल्लेख करत त्यांनी मातृभाषेबद्दलचा अभिमानही व्यक्त केला.
आपल्या भाषणात शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. ‘माझी एक बहीण आहे, पण लाडकी बहीण योजनेमुळे मला करोडो बहिणी मिळाल्या,’ असे सांगताना त्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला.
आई आणि पत्नीच्या कष्टांचा उल्लेख करताना शिंदे भावुक झाले. सामान्य कुटुंबातून आलेल्या आपल्या प्रवासात आई आणि पत्नीने केलेले कष्ट पाहिले असून, त्यामुळेच सर्वसामान्यांच्या अडचणी आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू समजतात, असे त्यांनी सांगितले.
‘विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल किंवा उंच इमारती नव्हेत; विकासाची संधी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग, ट्रान्सजेंडर धोरण, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मदत आणि वैद्यकीय सहाय्य यांसारख्या उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला.
महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख करताना शिंदे यांनी मुंबई आणि लंडन ही महत्त्वाची वित्तीय केंद्रे असल्याचे सांगितले. फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र आणि ब्रिटनमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत ‘मोदी हे भारताचे व्हिजनरी आणि डायनॅमिक लीडर आहेत’, असे शिंदे म्हणाले. भारत-ब्रिटन संबंध नव्या टप्प्यात प्रवेश करत असून, ब्रिटनमध्ये राहणारे महाराष्ट्रीय नागरिक दोन्ही देशांमधील महत्त्वाचा दुवा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेवटी ‘मी मुख्यमंत्री नाही, मी एक सामान्य माणूस आहे’ या आपल्या भूमिकेचा उल्लेख करत शिंदे यांनी सामान्य नागरिकांसाठी काम करण्याची बांधिलकी कायम असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टांचा आणि राज्याच्या विकासाच्या वाटचालीचा हा पुरस्कार गौरव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.