नागपूर : नागपूर शहरातील श्रीकृष्णनगर परिसरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रथमेश विजयराव गुजर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
प्रथमेश हा मूळचा अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी होता. शिक्षणाच्या निमित्ताने तो नागपुरातील श्रीकृष्णनगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मंगळवारी सकाळी घरमालकाच्या निदर्शनास प्रथमेशचा मृत्यू झाल्याचे आले. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, पोलिसांच्या तपासात प्रथमेशने लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत त्याने आजी, आई-वडिलांची माफी मागितल्याचे नमूद असल्याची माहिती आहे. तसेच आपल्या लहान बहिणीला चांगले शिक्षण मिळावे, अशी विनंती त्याने कुटुंबीयांकडे केली आहे. आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्याने चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रथमेश काही दिवसांपासून कोणत्या कारणामुळे तणावात होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्याच्या कुटुंबीयांकडूनही माहिती घेतली जात आहे.या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.