सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 जिल्हा

नंदुरबारसह राज्यातील ३६ जिल्ह्यांत स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय, मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती : उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत

डिजिटल पुणे    11-09-2026 15:22:10

नंदुरबार : मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र मराठी भाषा कार्यालये सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातही स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय सुरू करून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात किमान ५०० चौरस फुटांची जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले.

नंदुरबार येथे साहित्यसमवेत संवाद व आढावा बैठक बिरसा मुंडा  सभागृहात संपन्न झाले. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.सामंत बोलत होते. या परिषदेस आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.अनबलगन पी, मराठी भाषा विभागाचे भाषा संचालक डॉ.अरुण गिते, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी आदी उपस्थित होते.

उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यातील मराठी भाषा कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके, ग्रंथ आणि साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरेल. मराठी भाषेच्या प्रमाण भाषेबरोबरच विविध बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करण्याची गरज  आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भाषा, अहिराणी तसेच स्थानिक बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतील. भाषा आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन साहित्य संमेलने, सांस्कृतिक महोत्सव आणि विविध भाषिक उपक्रमांचे आयोजन करता येईल. यासाठी मराठी भाषा अधिकारी समन्वयक म्हणून काम करेल. जिल्ह्यात दरवर्षी मराठी भाषा, साहित्य, बोलीभाषा आणि संस्कृतीशी संबंधित संमेलन आयोजित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

जिल्ह्यातील लेखकांचे प्रकाशित साहित्य शासन खरेदी करणार

नंदुरबार जिल्ह्यातील लेखकांनी प्रकाशित केलेल्या मात्र ग्रंथालयांपर्यंत पोहोचू न शकलेल्या पुस्तकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अशा पुस्तकांची खरेदी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून योग्य पुस्तकांची निवड करून त्याच्या प्रती शासन खरेदी करेल आणि त्या जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. यामुळे नंदुरबारमधील लेखकांनी लिहिलेले साहित्य केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता जिल्ह्यातील वाचक आणि ग्रंथालयांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

वाहरू सोनवणे यांच्या गावाला ‘पुस्तकांचे आणि कवितांचे गाव’ करणार

ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे यांच्या श्रीखेडा गावाला ‘पुस्तकांचे आणि कवितांचे गाव’ करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच आदिवासी साहित्य, बोलीभाषा आणि मौखिक साहित्य परंपरेला मुख्य प्रवाहातील मराठी साहित्याशी जोडण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी साहित्यीकांनी नंदुरबार हा विविध मराठी बोलीभाषांनी समृद्ध असलेला आदिवासीबहुल जिल्हा आहे. अभिजात मराठी भाषा अधिक समृद्ध करायची असेल तर नंदुरबारसारख्या जिल्ह्यांमधील बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन आवश्यक आहे. त्यासाठी बोलीभाषा संवर्धन केंद्र उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली.


 Give Feedback



 जाहिराती