पुणे : 'ज्येष्ठ विचारवंत, प्रभावी वक्ते, पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ डॉ. रत्नाकर महाजन यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारविश्वाची मोठी हानी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे दीर्घ काळचे सहकारी हरपले' ; अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे पुणे शहराध्यक्ष विशाल तांबे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. रत्नाकर महाजन यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्ये आणि पुरोगामी विचारांची सातत्याने पाठराखण केली. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने आणि प्रभावी वक्तृत्वाने त्यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर ठसा उमटवला. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून तो सर्वसामान्यांना समजेल अशा प्रभावी पद्धतीने मांडण्याची त्यांची हातोटी विशेष उल्लेखनीय होती.पक्षाच्या वाटचालीत डॉ. महाजन यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. त्यांनी पक्षाच्या विचारधारेची आणि पुरोगामी मूल्यांची भूमिका ठामपणे मांडली. राजकारणाकडे केवळ सत्तेच्या दृष्टीने न पाहता समाजहित आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीचे माध्यम म्हणून पाहणारा एक अभ्यासू आणि संवेदनशील नेता म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या निधनाने केवळ पक्षाचेच नव्हे, तर महाराष्ट्रातील पुरोगामी आणि विवेकवादी विचारांच्या चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ. रत्नाकर महाजन यांनी आपल्या विचारांनी आणि कार्याने निर्माण केलेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.डॉ. रत्नाकर महाजन यांच्या कुटुंबीयांच्या आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना.