जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठोस निर्णय न झाल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाचा मार्ग आणि तारखांची घोषणा केली. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अंतरवाली सराटीतून मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर मुंबईकडे निघायचे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना केले. आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मागण्या मान्य होईपर्यंत शांततेच्या मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जरांगे यांनी जाहीर केलेल्या नियोजनानुसार, १५ सप्टेंबरला पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा, तर १६ सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे होणार आहे. त्यानंतर १७ सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे आंदोलकांचा मुक्काम असेल. १८ सप्टेंबरला खोपोली येथे मुक्काम करून पुढील दिवशी मुंबईत दाखल होण्याचे नियोजन आहे.
१९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळातच मराठा आंदोलन मुंबईत पोहोचणार असून, सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
यावेळी मुंबईकडे जाणारा मार्ग पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे परिसरातून ठेवण्यात आला आहे. यापूर्वी या भागातून मोर्चाचा मार्ग नसल्याने काही समाजबांधवांमध्ये नाराजी होती. ती दूर करण्यासाठी मार्गात बदल करण्यात आल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
मुंबईत येणे शक्य नसलेल्या मराठा समाजबांधवांनी आंदोलनाच्या मार्गावर उपस्थित राहून आंदोलकांना पाठिंबा आणि आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. मोर्चाच्या मार्गावर पाणी, अन्न आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्याची विनंती त्यांनी समाजबांधवांना केली आहे.
दरम्यान, आंदोलन शांततेच्या मार्गानेच करण्यावर जरांगे यांनी विशेष भर दिला. दगडफेक, जाळपोळ किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये, तसेच वाहने शिस्तीत चालवावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी आंदोलकांना दिल्या. अडथळा निर्माण झाल्यास पर्यायी मार्गाने पुढे जायचे, मात्र कोणत्याही परिस्थितीत ताकदीचा किंवा हिंसेचा वापर करायचा नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“डोक्याने जायचं आणि शांततेचा मार्ग सोडायचा नाही,” असा संदेश देत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. आता १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे