पुणे : पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 42 वर्षीय आयटी अभियंता विरेंद्र द्विवेदी यांचा मृत्यू झाला. सकाळी धावण्याचा सराव करत असताना भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र द्विवेदी हे नेहमीप्रमाणे सकाळी व्यायामासाठी पाषाण-बावधन रस्त्यावर आले होते. नेकलेस गार्डनजवळ असताना भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने द्विवेदी यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर कारमधूनच द्विवेदी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कार 'ब्लूरेज डेव्हलपर्स'च्या नावावर
दरम्यान, अपघातग्रस्त कारबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संबंधित कार 'ब्लूरेज डेव्हलपर्स' या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे तपासात आढळून आले आहे. कारचा अधिकृत पत्ता 'अबिल हाऊस' असा असल्याची माहिती मिळाली आहे.
चालकाच्या वयाबाबत चर्चा
अपघाताच्या वेळी कार एक 19 वर्षीय तरुण चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, चालकाचे वय, वाहन चालविण्याचा परवाना आणि अपघाताच्या नेमक्या परिस्थितीबाबत पोलिसांकडून अधिकृत तपास सुरू आहे. अपघातात कारचालकही जखमी झाल्याची माहिती आहे.
CCTV फुटेजची पोलिसांकडून तपासणी
या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. कारचा वेग किती होता, चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले आणि अपघाताच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास करण्यासाठी परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहे.सकाळी व्यायाम, धावणे आणि सायकलिंगसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. निष्काळजीपणे किंवा भरधाव वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.