धायरी : धायरी-खडकवासला परिसरातील एकतन निवास धनगर वस्ती येथे अनुलोम संस्थेच्या वतीने NCMC स्मार्ट कार्ड कॅम्प तसेच शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन अभियानाचे आयोजन करण्यात आले. दुर्लक्षित व गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, तसेच आवश्यक सेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी परिसरातील प्रभावशाली व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते तसेच अनुलोम मित्रांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित नागरिक व महिलांना विविध शासकीय योजना, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
खडकवासला भागाच्या जनसेविका सौ. नयन चव्हाण यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. अनेकदा माहितीच्या अभावामुळे पात्र असूनही नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि आवश्यक मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या NCMC स्मार्ट कार्ड कॅम्पमध्ये तब्बल १२३ नागरिकांनी स्मार्ट कार्ड काढून घेतले. यामध्ये परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच इतर नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. नागरिकांच्या सोयीसाठी त्यांच्या परिसरातच अशा प्रकारचे कॅम्प आयोजित केल्याने वेळ आणि श्रमाची बचत होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
अनुलोम संस्थेच्या माध्यमातून यापुढेही परिसरातील नागरिकांसाठी शासकीय योजना मार्गदर्शन व सेवा शिबिरे नियमितपणे राबविण्यात येणार आहेत. विशेषतः दुर्लक्षित व वंचित भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि सुविधा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास सौ. रोहिणीताई राहणे, सामाजिक कार्यकर्ते व अनुलोम मित्र श्री. तानाजी कांबळे, श्री. दिलीप रायकर, सौ. नागरताई जाधव, सौ. भारतीताई लोहकरे, सौ. तृप्तीताई देशमुख, सौ. योगिताताई सह्याद्रीकर, कु. एकतन देशमुख, श्री. निलेशदादा पोकळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानामुळे परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी स्मार्ट कार्ड तसेच शासकीय योजनांबाबत आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळाले. शासकीय योजना आणि सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, नागरिकांनी या अभियानाचे मनापासून स्वागत केले.