मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका छोट्याशा सोशल मीडिया पोस्टने सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच...’ अशी मोजक्या शब्दांतील पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. मात्र, या पोस्टमध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसल्याने त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंची ही पोस्ट समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. त्यानंतर राज ठाकरेंच्या सूचक पोस्टने राजकीय चर्चेला आणखी वेग आला आहे.
अमित शाहांच्या विधानाचा संदर्भ?
राज ठाकरेंच्या पोस्टचा संबंध केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नुकत्याच झालेल्या एका विधानाशी जोडला जात आहे. नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित ‘हिंदी दिवस-२०२६’ आणि सहावे अखिल भारतीय राजभाषा संमेलनात अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या बहुभाषिक संस्कृतीचा उल्लेख केला होता.
‘महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठे बहुभाषिक राज्य आहे,’ असे अमित शाह यांनी म्हटले होते. महाराष्ट्राच्या भूमीवर मराठीसोबतच कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड आणि वारली यांसारख्या विविध भाषांचा विकास झाल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याचवेळी महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याच विधानावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर आता राज ठाकरेंची पोस्ट समोर आली आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे का, अशी चर्चा रंगली आहे.
‘महाराष्ट्रात मराठीचा सन्मान झाला पाहिजे’
अमित शाह यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या बहुभाषिक संस्कृतीचा गौरव करताना त्यांनी विविध भाषांच्या योगदानाचाही उल्लेख केला.
मात्र, महाराष्ट्राची ओळख आणि मराठी भाषेचा मुद्दा हा राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेचा केंद्रबिंदू राहिला आहे. मराठीचा सन्मान आणि महाराष्ट्राची भाषिक ओळख यावर तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका ते सातत्याने मांडत आले आहेत.त्यामुळे अमित शाह यांच्या ‘महाराष्ट्र बहुभाषिक राज्य’ या विधानाच्या पार्श्वभूमीवरच राज ठाकरेंनी ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...’ अशी पोस्ट केली आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पोस्टचा नेमका अर्थ राज ठाकरे स्वतः स्पष्ट करतात का, की ही केवळ सूचक राजकीय टिप्पणी आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, राज ठाकरेंनी पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नसल्याने त्यांचा निशाणा नेमका कोणावर आहे, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.