सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
  • विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
  • आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
  • गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
 शहर

पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला दुचाकीस्वाराचा कट; ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल, पोलिसांनी नोटीस बजावली

डिजिटल पुणे    15-09-2026 15:18:03

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर दुचाकी बेदरकारपणे चालवत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ३२ वर्षीय तरुणाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम विजय वनित असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी त्याला नोटीस बजावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे विमानतळावरून कोथरूड येथील निवासस्थानी जात होते. त्यांचा वाहनांचा ताफा संचेती पुलावरून स. गो. बर्वे चौकाच्या दिशेने जात असताना जंगली महाराज रस्त्याच्या परिसरात एक दुचाकीस्वार ताफ्याच्या पुढे आला.

आरोपानुसार, संबंधित दुचाकीस्वाराने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत वेगाने आणि वेड्यावाकड्या पद्धतीने वाहन चालवले. त्याने ताफ्यातील एका वाहनाला कट मारल्याने काही काळ वाहनचालकांना अडथळा निर्माण झाला. त्यानंतर तो दुचाकीवरून तेथून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी मोहोळ यांचे अंगरक्षक सहाय्यक पोलीस फौजदार ईश्वर लक्ष्मण भिकुले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शुभम विजय वनित याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर पोलिस मध्यरात्री संबंधित तरुणाच्या नाना पेठेतील घरी पोहोचल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असून त्याला नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मध्यरात्री झालेल्या पोलिसांच्या कारवाईबाबत अधिकृत तपशील समोर आलेला नाही.

गणेशोत्सवाच्या गर्दीत ताफ्यामुळे वाहतूक कोंडी

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील विद्युत रोषणाईच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागांत मोठी गर्दी असताना मंत्र्यांचा ताफा या परिसरातून गेल्याने वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे चित्र होते.

गर्दीच्या ठिकाणी व्हीआयपी वाहनांचा ताफा नेण्याची गरज होती का, असा सवाल काही नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. एका बाजूला ताफ्याला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर कारवाई झाली आहे, तर दुसरीकडे गणेशोत्सवातील वाहतूक व्यवस्थेवरूनही चर्चा सुरू झाली आहे.या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती