मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हिंदी भाषेबाबतच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांच्या टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं, तर त्यांच्यावर टीका करण्याची गरजच भासली नसती, असं फडणवीसांनी म्हटलं. तसेच, “अमित शाह काय बोलले हे पूर्ण ऐकलं असतं तर यांची थोबाडं काळी झाली असती,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
नवी मुंबईत झालेल्या राजभाषा संमेलनात अमित शाह यांनी महाराष्ट्र हा बहुभाषिक प्रदेश असल्याचं नमूद केलं होतं. मातृभाषेसोबत दुसरी राष्ट्रीय भाषा शिकण्याला विरोध करणं योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं. शाह यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि मनसेकडून आक्षेप घेण्यात आला.
या टीकेवर बोलताना फडणवीसांनी अमित शाह यांच्या भाषणातील भूमिकेचा संदर्भ दिला. महाराष्ट्रात मराठी भाषेचं महत्त्व काय आहे, मातृभाषेचं स्थान किती महत्त्वाचं आहे, हे शाह यांनी स्पष्ट केलं होतं, असं ते म्हणाले. महाराष्ट्रातील नागरिक अनेक भाषा बोलतात म्हणून त्यांची मातृभाषा बदलत नाही. भाषणातील काही भाग निवडकपणे ऐकून त्यावर टीका करणं योग्य नाही, असंही फडणवीसांनी सुनावलं.
राज ठाकरेंची सूचक पोस्ट चर्चेत
अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट केली होती. “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच...” असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या या पोस्टचा रोख अमित शाह यांच्या हिंदी संमेलनातील वक्तव्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जरांगे यांच्या आंदोलनावर फडणवीस काय म्हणाले?
मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केलं. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. आंदोलनासाठी पुन्हा अर्ज करण्यात आला असून त्यावर नियमांनुसार आणि परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे या काळात कायदा-सुव्यवस्था राखणं महत्त्वाचं असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. जरांगे यांच्या अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या असून काही मुद्दे न्यायालयाच्या विचाराधीन असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दिशा सालियन प्रकरणावर फडणवीसांची सावध भूमिका
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने नव्याने एफआयआर दाखल केल्याच्या चर्चेबाबतही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांची नावं असल्याचा दावा केला जात आहे.यावर फडणवीसांनी आपण संबंधित एफआयआर पाहिलेली नसल्याचं स्पष्ट केलं. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने एफआयआर दाखल केली असल्याने त्यावर आत्ताच कोणतेही तर्क-वितर्क करणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.