सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

सुपे घाटात विद्यार्थ्यांची एसटी बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

डिजिटल पुणे    16-09-2026 12:16:50

बारामती : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटात पलटी होऊन झालेल्या अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी (१६ सप्टेंबर) सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडला. बसचा वाहकही या दुर्घटनेत जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती आगाराची सीएनजीवर धावणारी एसटी बस पाटस येथून विद्यार्थ्यांना घेऊन कुसेगाव, पडवीमार्गे सुप्याकडे येत होती. सुपे घाटातील चढ चढत असताना बसला पुरेशी ताकद मिळत नसल्याने ती मागे सरकू लागली. यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने घाटाच्या सुरुवातीच्या वळणावर बस रस्त्यावरच पलटी झाली.

अपघातानंतर बसमधील विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिक तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

जखमी विद्यार्थ्यांना चौफुला येथील हर्ष हॉस्पिटलसह केडगाव-चौफुला परिसरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुण्यातील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांनी दिली.

बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ४० असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती.दरम्यान, विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी अपघातस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार मिळत आहेत का, याचीही माहिती घेतली.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, बसने प्रवास न केल्यामुळे अपघातातून बचावलो, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी साईराज सुनील चोरमले याने दिली. त्याला स्पोर्ट्स शूज घ्यायचे असल्याने त्याने वडिलांकडे दुचाकीवरून जाण्याचा हट्ट केला होता. त्यामुळे तो एसटी बसमधून न जाता दुचाकीवरून गेला आणि या अपघातातून बचावला.


 Give Feedback



 जाहिराती