नवी दिल्ली : UPI व्यवहारांवरील शुल्काच्या मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा मार्ग सरकारने खुला केल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी हे शुल्क मागे घेण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या एका विधानाचा संदर्भही दिला.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्हिडिओ पोस्ट करत UPI शुल्काच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. इंदिरा गांधी यांना एकदा त्यांचा कल डावीकडे आहे की उजवीकडे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी आपला विचार कोणत्याही एका बाजूचा नसून ‘सरळ’ असल्याचे सांगितले होते, असा उल्लेख राहुल गांधी यांनी केला.
यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका केली. मोदी हे ना डावीकडे आहेत, ना उजवीकडे; मात्र त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर शरणागती पत्करल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. UPI वरील शुल्क आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार धोरणाचा संदर्भ देत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
‘दुकानदारांकडून शुल्क घेतलं तर त्याचा भार ग्राहकांवर पडेल’
राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार, २,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मर्चंट UPI व्यवहारांवर MDR लागू करण्याचा मार्ग सरकारने खुला केला आहे. अशा व्यवहारांची संख्या सुमारे ५ टक्के असली, तरी UPI व्यवहारांच्या एकूण मूल्याच्या सुमारे ६५ टक्के व्यवहार या श्रेणीत येतात, असा दावा त्यांनी केला
सरकारकडून ग्राहकांकडून थेट कोणतीही फी आकारली जाणार नसल्याचे सांगितले जात असले, तरी व्यापाऱ्यांकडून आकारले जाणारे शुल्क अखेरीस वस्तू आणि सेवांच्या किमतीत समाविष्ट होऊन त्याचा अप्रत्यक्ष भार ग्राहकांवर पडू शकतो, असा युक्तिवाद राहुल गांधी यांनी केला.
अमेरिकन पेमेंट कंपन्यांचा मुद्दाही उपस्थित
अमेरिकेतील पेमेंट कंपन्या भारताच्या ‘झिरो-MDR’ धोरणाला दीर्घकाळापासून विरोध करत असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. आता केंद्र सरकार त्याच दिशेने धोरण बदलण्याचा मार्ग मोकळा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकन दबावापुढे झुकल्याचा आरोप केला. “अमेरिकेसमोर झुकणं बंद करा, धाडस दाखवा, उभे राहा आणि UPI कर मागे घ्या,” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.दरम्यान, UPI व्यवहारांवरील MDR किंवा शुल्कासंदर्भातील नियम, त्याची अंमलबजावणी आणि ग्राहकांवर होणारा संभाव्य परिणाम याबाबत अधिकृत धोरण स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.