शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील अटगावजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन करून मुंबईकडे परतणाऱ्या कुटुंबाच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कुटुंब मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील रहिवासी होते. कुटुंबीय त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून मुंबईच्या दिशेने परतत असताना अटगावजवळ त्यांच्या वाहनाचा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक झाली. विशेष म्हणजे, हा ट्रक सुमारे दोन वर्षांपूर्वी जळालेला असून त्यानंतर तो त्याच ठिकाणी उभा असल्याची माहिती समोर आली आहे.
धडक इतकी जोरदार होती की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. अपघातात श्रीराम जैस्वाल, आयुष जैस्वाल, लाडो जैस्वाल आणि सुरज जैस्वाल यांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अन्य सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी चौघांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.या प्रकरणी पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा अधिक तपास सुरू आहे