सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पीएम मोदी UPI Tax मागं घ्या, इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींची मागणी, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी शरणागती स्वीकारल्याचं टीकास्त्र
 जिल्हा

समुद्रात गेलेला फुटबॉल आणायला गेला अन् परतलाच नाही; वसईच्या सुरुची बीचवर १५ वर्षीय अंकित बेपत्ता, ७२ तासांनंतरही शोध सुरू

डिजिटल पुणे    16-09-2026 18:40:21

वसई : गणेश चतुर्थीच्या दिवशी मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासाठी सुरुची बीचवर गेलेला १५ वर्षीय अंकित गुप्ता समुद्रात बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. फुटबॉल समुद्राच्या पाण्यात गेल्यानंतर तो आणण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, त्यानंतर अंकितचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. घटनेला ७२ तासांहून अधिक काळ उलटूनही त्याचा शोध सुरूच आहे.

अंकित हा नायगाव पूर्व परिसरातील रहिवासी असून तो रश्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववी इयत्तेत शिक्षण घेत आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ५.५० वाजता तो डॉन बॉस्को येथे फुटबॉल खेळण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. मित्रांसोबत ओला कॅबने ते सुरुची बीचवर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

फुटबॉल खेळत असताना चेंडू समुद्राच्या पाण्यात गेला. तो आणण्यासाठी अंकितसह त्याचे दोन मित्र पाण्यात गेले. अंकित पुढे गेल्यानंतर त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडल्याची माहिती मित्रांनी दिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास तो बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वसई पोलिस, अग्निशमन दल आणि भारतीय तटरक्षक दलाने शोधमोहीम सुरू केली. समुद्रात बोटींच्या माध्यमातून तसेच तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने हवाई शोध घेण्यात येत आहे. मात्र, समुद्रातील वेगवान प्रवाह, लाटांचा जोर आणि मोठे शोधक्षेत्र यामुळे बचाव पथकांसमोर मोठे आव्हान आहे.

दरम्यान, अंकितच्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अंकित पाण्यात पडल्यानंतर तातडीने आरडाओरड करून मदत का मागितली गेली नाही, असा सवाल कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. स्थानिक मच्छिमारांनाही वेळेत माहिती मिळाली असती तर मदत करता आली असती, असे त्यांचे म्हणणे आहे.

अंकितचे काका धर्मेंद्र गुप्ता यांनी पोलिसांनी प्रत्येक मुलाची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. आतापर्यंत मुलांची एकत्रित चौकशी झाल्याचे त्यांनी सांगितले असून, घटनेबाबत अधिक स्पष्टता मिळण्यासाठी स्वतंत्र चौकशी आवश्यक असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

दरम्यान, १४ सप्टेंबरपासून कुटुंबीय घटनास्थळी उपस्थित असून अंकितचा शोध सुरू आहे. ७२ तासांहून अधिक काळ उलटूनही त्याचा ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. बचाव पथकांकडून समुद्र परिसरात शोधमोहीम सुरू असून अंकितचा शोध लागण्याची प्रतीक्षा आहे.


 Give Feedback



 जाहिराती