पुणे : युट्युबर संतोष पंडित यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली आहे. न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. १६ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर झाल्यानंतर बुधवारी (१७ सप्टेंबर) त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांच्यावर काही अटीही घातल्या आहेत. त्यानुसार, पंडित यांनी फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये, तसेच प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
कारागृहातून बाहेर आल्यानंतर संतोष पंडित यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली बाजू मांडली. या प्रकरणामुळे मोठा धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.“मी जे काही करतोय, तो माझा संवैधानिक अधिकार आहे. याआधीही मी हा अधिकार बजावत होतो आणि पुढेही बजावत राहणार,” अशी भूमिका पंडित यांनी व्यक्त केली.तसेच, “मी थांबणार नाही. लोकशाहीमध्ये जनता देशाची मालक आहे. जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत. आपण ज्यांना निवडून देतो आणि जे सत्तेत आहेत, त्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत,” असेही त्यांनी म्हटले. आपण कोणावरही वैयक्तिक टीका केलेली नसल्याचा दावाही पंडित यांनी केला.
चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील व्हिडीओ ठरला वादाचा केंद्रबिंदू
संतोष पंडित हे पुणे महापालिकेच्या विकासकामांसह विविध नागरी प्रश्नांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ प्रसिद्ध करत असतात. काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचा वापर असलेली व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला.
या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयितांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. संबंधित व्हिडीओमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याबाबत असभ्य भाषेचा वापर करून बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
जामिनावर सुटका झाल्यानंतर संतोष पंडित यांनी आपली भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ते आगामी काळात पुन्हा व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणार का, याकडे लक्ष लागले आहे.