सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पीएम मोदी UPI Tax मागं घ्या, इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींची मागणी, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी शरणागती स्वीकारल्याचं टीकास्त्र
 शहर

गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांना मोठा फटका; पुणे विभागात 15 दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले

डिजिटल पुणे    18-09-2026 16:00:42

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात पुणे रेल्वे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हडपसर–घोरपडीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी तब्बल 15 दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026 या कालावधीत पुणे आणि हडपसर यार्डमध्ये अभियांत्रिकी, सिग्नल-टेलिकॉम आणि ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित कामे केली जाणार आहेत.

या कामासाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. या काळात काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या पुण्याऐवजी दौंड, सोलापूर किंवा कुर्डुवाडीपर्यंतच धावणार असून काही गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुटणार आहेत.

'या' गाड्या राहणार रद्द

- 12169/12170 पुणे–सोलापूर–पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस : 19 ते 23 सप्टेंबर तसेच 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी रद्द.

- 12116 सोलापूर–सीएसएमटी सिद्धेश्वर एक्स्प्रेस : 3 ऑक्टोबर रोजी रद्द.

- 12115 सीएसएमटी–सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस : 4 ऑक्टोबर रोजी रद्द.

- 12157/12158 पुणे–सोलापूर–पुणे हुतात्मा एक्स्प्रेस : 4 ऑक्टोबर रोजी रद्द.

अनेक एक्स्प्रेसचे मार्ग बदलणार

ब्लॉकच्या कालावधीत काही लांब पल्ल्याच्या गाड्या पुणे मार्गाऐवजी पर्यायी मार्गाने धावणार आहेत. यामध्ये सीएसएमटी–चेन्नई, सीएसएमटी–भुवनेश्वर, एलटीटी–काकीनाडा, नागरकोईल–एलटीटी, बंगळुरू–सीएसएमटी, विशाखापट्टणम–एलटीटी, चेन्नई–एलटीटी, सीएसएमटी–बिदर, सिकंदराबाद–राजकोट, एलटीटी–कोयंबतूर, तिरुवनंतपुरम–एलटीटी आणि कोयंबतूर–एलटीटी या गाड्यांचा समावेश आहे.

काही गाड्या कल्याण–इगतपुरी–मनमाड–दौंड, तर काही सोलापूर–कुर्डुवाडी–मिरज–सातारा–पुणे किंवा दौंड–अहिल्यानगर–मनमाड–इगतपुरी–कल्याण या मार्गाने वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही गाड्यांना पुणे, लोणावळा, दौंड, कर्जत किंवा इतर नियोजित स्थानकांवर थांबा मिळणार नाही.

काही गाड्या पुण्याऐवजी दौंड किंवा सोलापूरपर्यंत

17014 काझीपेट–हडपसर एक्स्प्रेस काही निश्चित तारखांना दौंड येथेच अंशतः समाप्त केली जाईल, तर 3 ऑक्टोबर रोजी तिचा प्रवास कुर्डुवाडी येथे संपवण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे 17013 हडपसर–काझीपेट एक्स्प्रेस काही तारखांना हडपसरऐवजी दौंड येथून, तर 4 ऑक्टोबर रोजी कुर्डुवाडी येथून सुरू केली जाणार आहे.

12157 पुणे–सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस 20, 23 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर रोजी दौंड येथून सुरू होईल. तर 12158 सोलापूर–पुणे हुतात्मा एक्स्प्रेस 3 ऑक्टोबर रोजी दौंड येथेच समाप्त केली जाणार आहे.

काही गाड्यांना विलंब; वेळापत्रकातही बदल

ब्लॉकमुळे काही गाड्यांचे नियमन करून त्या उशिराने धावणार आहेत. काही गाड्यांना पाटस–उरुळी, चिंचवड–खडकी, दौंड–लोणी आणि लोणावळा–पुणे या विभागांमध्ये थांबवण्यात किंवा नियंत्रित करण्यात येणार आहे.

याशिवाय काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. 12157 पुणे–सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस 19 सप्टेंबरला सायंकाळी 6.20 वाजता, तर 21 आणि 22 सप्टेंबरला सायंकाळी 6.10 वाजता पुण्याहून सुटेल. या गाडीची नियोजित सुटण्याची वेळ 5.50 वाजता आहे.

22732 सीएसएमटी–हैदराबाद एक्स्प्रेस 20 सप्टेंबरला दुपारी 2.10 ऐवजी सायंकाळी 4.10 वाजता सुटणार आहे. तर 17222 एलटीटी–काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस 4 ऑक्टोबरला दुपारी 1.15 ऐवजी दुपारी 3.15 वाजता सुटेल.

प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी असताना हा ब्लॉक लागू होणार असल्याने प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट बुक करण्यापूर्वी आणि प्रवासाच्या दिवशी संबंधित गाडीचे सुधारित वेळापत्रक तपासावे. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲपवरून गाडीची स्थिती आणि मार्गाची माहिती पडताळूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती