सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंधभक्तांची जमात फोफावत चाललीय, त्यांना कायद्याची भीती राहिली नाही का? बिहारमधील जमुई येथील प्रकाराबाबत रोहिणी खडसेंकडून संताप व्यक्त
  • मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; देशात पावसाची 15 टक्के तूट, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज
 शहर

पुणेकरांनो, ऐकू कमी येण्याआधी डॉक्टरांचे म्हणणे जरूर ऐका : लाऊडस्पिकरविरोधी पुणेकर मंचाचे आवाहन

डिजिटल पुणे    21-09-2026 11:50:29

 पुणे : अनेक डॉक्टरांनी या आवाज प्रदूषण आणि त्यातून होऊ शकणारे आरोग्याचे नुकसान या विषयी इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणणे आपण जरूर ऐकुया.

डॉक्टरांचे पुणेकरांना आवाहन :

आपल्या भोवती सतत आवाज असतो. हे सारे आवाज आपल्याला कधीच त्रासदायक वाटत नाहीत, उलट  ही  आवाजाची जाणीव आपल्याला सुरक्षितता देते, माणसात असल्याचा विश्वास देते . हे सारे काहीवर्षांपूर्वीचे चित्र, आता मात्र भोवतीचा अर्थहीन गोंगाट आणि त्याची दिवसेंदिवस  वाढणारी  पातळी आपला पिच्छा सोडत नाही. 

कोणता आवाज ऐकायचा ? कोणता आवाज ऐकायचा नाही हा निर्णय आपण घेऊ शकत नाही. कानावर पडणारा प्रत्येक आवाज मेंदूतील श्रुती केंद्रात पोहचतो. आपल्या कानाला  चालू बंद करण्याचे वा  आवाज लहान -मोठा करण्याचे देखील  बटण  नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे आवाज ऐकण्याची सक्ती सर्वाना होते. सतत कानावर पडणाऱ्या आवाजामुळे आपली आवाज सहन करण्याची सहनशीलता कमी होऊ लागते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात बदल दिसू लागतो, किरकोळ कारणाने चिडचिड होऊ लागते, रक्तदाबात बदल होणे, मधुमेही लोकांच्या साखरेच्या पातळीत बदल, निद्रानाश, एकाग्रतेचा अभाव  असे अनेक बदल दिसू लागतात. ह्या साऱ्याला भोवतालचा तीव्र आवाज कारणीभूत आहे हे  आपल्या लक्षात येत नाही.

सर्वसाधारणपणे  सर्वानाच ह्या आवाजाचा त्रास जाणवू लागला आहे. सर्वच उत्सवाच्या काळात हीच आवाजाची पातळी प्रमाणाबाहेर वाढते  ( १०० डीबी पेक्षा अधिक होते. ). ढोल ताशा  वादक, डीजे वर नाचणारी तरुणाई  ह्यांच्याही कानावर परिणाम होत असतात. तरुण मंडळींना लगेच श्रवण दोष येईल असे नाही, पण तीव्र आवाजाने थकणे , कानात दडे बसणे, कानांत  कर्णनाद जाणवणे हे घडत असते . त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . कोणताही आवाज वय, लिंगभेद जाणत नाही , सर्वांच्या कानावर तितकाच परिणाम घडत असतो . काहींच्या बाबतीत रक्तदाब वाढणे , हृदयावर दबाव येणे असेही घडू शकते. हृदयविकारअसणार्यांनी अधिक सावधगिरी बाळगायला हवी. दर एक तासाच्या अथक वादनानंतर  वीस मिनिटांची  विश्रांती  हा मंत्र खूप  उपयोगाचा ठरेल.

श्रवण दोष हा हलक्या पावलानी आत येत असतो, होणारा  परिणाम हळूहळू होत असल्यामुळे श्रवणदोषाची जाणीव होत नाही, तरीही हा दोष कायम स्वरूपी असतो . त्यासाठी श्रवण चाचणी हा एक सोपा आणि उत्तम मार्ग आहे 

पुढील चार पाच महिने विविध प्रकारचे उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु असतील, त्यातील विविध आवाजाचे, संगीताचे प्रकार ,मांडवांमुळे वाहनांची गर्दी , त्यातून निर्माण होणारे अनियंत्रित आवाज आपल्या कानाला दमवतील. आनंद घेताना चोर पावलांनी येणारे कानाचे विकार आपल्याला समजत नाही.  आपण आपल्या कानांची काळजी घेणे अनिवार्य आहे.

पुणेकरांनो, चला तर, निर्धार करूया.

 गोंगाटाचे प्रदूषण नियम २००० याचे पालन करू या. डॉल्बी,डीजे/ स्पीकरचा आवाज आणि इतर वादनाचे आवाज कमाल मर्यादेच्या आत ठेवण्याचा प्रयत्न करू या.

कानात इअर प्लग घालू या. दर  तासामागे वीस मिनिटे कानाला विश्रांती  देऊ या. रुग्ण, बालके, वयस्कर यांची विशेष काळजी घेऊया.

कानात दडा बसला तर कानाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तीव्र आवाजाशी संबंध असलेल्या सर्व व्यक्तींनी कानांची  श्रवण चाचणी नियमित करून घ्या.

डॉ.कल्याणी मांडके, डॉ राहुल सावंत, डॉ सिमी आठवले, डॉ शारदा बापट, डॉ संजय दाभाडे, डॉ चंद्रशेखर फणसळकर, डॉ  विलास बापट, डॉ अनंत फडके, डॉ श्रीराम जोशी, संगीता साळवी, डॉ संजय देशमुख , डॉ अलका बापट, डॉ वैभव विद्वांस, डॉ शिवराज कोंडे, डॉ आशिष अत्रे , डॉ प्रवीण पिसोळकर, डॉ भास्कर जेधे, डॉ प्रकाश कुलकर्णी, डॉ प्रवीणकुमार थोरात, डॉ दीपा मुझुमदार ,डॉ प्रवीण दरक ,डॉ निहाल आठवले  डॉ अजिंक्य दरक, डॉ श्रीराम आठवले , डॉ दिपाली दरक, डॉ विक्रम ओक,डॉ ज्योती शिंदे, डॉ सुधीर मुंडले , डॉ अभिजित मोरे, डॉ सुरेश बोरकर ,डॉ विनय भोसले, वैद्य महेंद्र पाटे, वैद्य विवेक सरपोतदार  

लाऊडस्पिकरविरोधी पुणेकर मंच

PUNEKARS against LOUDspeakers group

 


 Give Feedback



 जाहिराती