मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत असल्याने काही भाविकांना रांग टाळून थेट दर्शन घेण्याची इच्छा असते. याचाच गैरफायदा घेत चार भाविकांना थेट चरणस्पर्श दर्शनाचे आमिष दाखवून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी बारावीतील विद्यार्थी प्रणव यादव याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रणव यादव याने काही भाविकांशी संपर्क साधत रांगेत उभे न राहता लालबागच्या राजाचे थेट चरणस्पर्श दर्शन करून देण्याचे आश्वासन दिले. या बदल्यात त्याने भाविकांकडून पैसे घेतले. यापैकी एका भाविकाकडून ८५० रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र पैसे घेतल्यानंतर आरोपीने भाविकांना आश्वासन दिल्याप्रमाणे दर्शनाची व्यवस्था केली नाही. त्यामुळे एका भाविकाने काळाचौकी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता प्रणव यादव याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली.
चार भाविकांची फसवणूक
या प्रकरणात आतापर्यंत चार भाविकांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आरोपीने आणखी किती जणांना अशाच प्रकारे लक्ष्य केले आहे का, याबाबतही तपास केला जात आहे.
भाविकांना सावध राहण्याचे आवाहन
घटनेनंतर लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि पोलिस प्रशासनाकडून भाविकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. थेट दर्शन, चरणस्पर्श दर्शन किंवा रांग टाळून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली कोणी पैसे मागितल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे सांगण्यात आले आहे. भाविकांनी अधिकृत व्यवस्था आणि सूचनांचे पालन करावे, तसेच कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, यासाठी लालबाग परिसरात जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहेत.